

दिगंबर दराडे
पुणे : पुणे-नाशिक रेल्वेपाठोपाठ पुणे रिंगरोडचे पहिले अॅग्रीमेंट फेब्रुवारीअखेर करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. याची सर्व पातळीवर तयारी सुरू आहे. शेतकर्यांना देण्यात येणार्या मोबदल्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.
पुण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला रिंगरोड मागील पंधरा वर्षांपासून रखडला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत ही तरतूद खर्ची करा, अशा शब्दांत पालकमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) आदेश दिले आहेत. त्यामुळे रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून, हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.
रिंगरोडच्या कामाला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गिकेच्या मोजणीच्या कामाला 21 एप्रिल 2021 रोजी सुरुवात करण्यात आली. एकूण 37 गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. त्यापैकी 35 गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी 695 हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत 35 गावांतील 630 हेक्टरहून अधिक जमिनींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 1 गावाच्या मोजणीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत पश्चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
भोर तालुका : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे., हवेली तालुका : रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली., मुळशी तालुका : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, ससेवाडी, पिंपलोळी., मावळ तालुका : पाचणे, चांदखेड, बेबडओहोळ, धामणे, परंदवाडी उर्से. हा प्रकल्प पश्चिम भागातील चार तालुक्यांतील 37 गावांतून जाणार आहे.