पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना वाव देणार्या 50 व्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावले आहे. 'मिन्को' या सादरीकरणासाठी संघाने बाजी मारत फिरोदिया करंडकावर नाव कोरले आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संघाने 'रहनुमा'साठी द्वितीय क्रमांक, तर पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने 'यात्रिक'साठी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विशेष लक्षवेधी पुरस्कार सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या संघाला 'बचके रेहेना रे बाबा'साठी मिळाला आहे.
स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 25) रात्री जाहीर करण्यात आला. अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाल्यावर विजेत्या संघातील कलाकारांनी एकच जल्लोष केला. आव्वाज कुणाचा… जयघोषाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह दणाणून गेले. सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमीनिर्मित आणि एचसीएल फाउंडेशन, पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित फिरोदिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आली होती. नऊ महाविद्यालयांच्या संघात अंतिम फेरीसाठी चुरस होती.
कलाकारांच्या वेगळ्या धाटणीच्या सादरीकरणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने दाद मिळवली. अंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन आणि पौर्णिमा मनोहर यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मार्चच्या दुसर्या आठवड्यात होणार आहे.
लेखन : प्रथम – प्रणव जगताप (मिन्को, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ), द्वितीय – विश्वजित जाधव (यांत्रिक, पद्मभूषण वसंतदादा पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), तृतीय – श्रीनिधी झाड, शिरीन बर्वे (बचके रेहेना रे बाबा, सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
दिग्दर्शन : प्रथम – प्रणव जगताप, राघवेंद्र कुलकर्णी (मिन्को, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ), द्वितीय – श्री. पगारे, आदित्य सावंत (यांत्रिक, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), तृतीय – प्रत्युषा हुद्दार, सुजल धडोती (रहनुमा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी)
अभिनय (पुरुष) : प्रथम – पार्थ दीक्षित, श्रीनिधी झाड (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), द्वितीय – सर्वेश तिखे, प्रेषित गुजर (सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ), तृतीय – श्री. पगारे (पीव्हीपीआयटी)
अभिनय (स्त्री) : प्रथम – समृध्दी शेट्टी (डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), द्वितीय – भूमी राठी (व्हीआयआयटी), तृतीय – योगदा शिंदे (एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय)
हेही वाचा