मुळा-मुठासाठी जनता अदालत घेणार : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे | पुढारी

मुळा-मुठासाठी जनता अदालत घेणार : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील पर्यावरणाचा सर्वनाश करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी दोन्ही नद्यांचे पात्र कमी होत असून, भविष्यात गंभीर परिस्थिती ओढावली जाणार आहे. मुळा- मुठा या नद्यांचा नदीसुधार प्रकल्पामुळे नदी सुधार होत नसून, भकास होत आहे. मुळा- मुठा वाचविण्यासाठी मार्च महिन्यात जनता अदालत घेणार असून, सामान्य जनतेला याविषयी जागृत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये पर्यावरणप्रेमी संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाचे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, आपचे विजय कुंभार, अजित अभ्यंकर, सारंग यादवाडकर व विविध पर्यावरणप्रेमी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, नदीसुधारमुळे नद्यांचे पात्र अरुंद होत आहेत. यामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असून, अनेक मानवनिर्मित संकटे ओढवली जातील.

अगोदर पात्राच्या शेजारी असणार्‍या समस्या दूर करून नदीसुधार, सुशोभीकरण करण्यात यावी. परंतु, इथे उलट सुरू आहे. हे कामदेखील गुजराती ठेकेदाराला दिले. नदीसुधार प्रकल्पामुळे नद्यांचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे मुळा- मुठा नदीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पर्यावरणप्रेमींकडून अनेकदा चुकीच्या होणार्‍या कामाची पोलखेल करण्यात आली आहे. तरीही अधिकारी ऐकायला तयार नाहीत. प्रशासक काळात राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे. वरून आलेल्या आदेशामुळे अधिकारी कोणाला भेटत नाही. उत्तर देत नाही. सध्या जगात सर्वत्र नद्यांचा विस्तार केला जात आहे. परंतु, पुण्यात उलट सुरू आहे.

भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे…

नदीसुधार प्रकल्पामध्ये अनेक चुकीची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात येत असून, पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. नदीसुधार करणे याला आमचा विरोध नाही. परंतु, सामान्य लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी पक्ष, रंग, विचार सोडून पुणेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येऊन ही लढा लढविला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button