पुणे: बनावट कागदपत्रे तयार करुन नसलेल्या जमिनीतुन कमावले कोट्यवधी रुपये

पुणे: बनावट कागदपत्रे तयार करुन नसलेल्या जमिनीतुन कमावले कोट्यवधी रुपये
Published on
Updated on

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मोजणी अधिकारी, आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करुन गटात नसलेली जमीन दाखवुन त्यावर प्लॉटिंग करून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची मलई लाटण्याचा प्रकार राजगुरूनगर नजीकच्या होलेवाडी (ता. खेड) येथे घडला. शेतकऱ्यांच्या पूर्वापार जमिनीवर तसेच आजूबाजूच्या रस्ता व ओढ्यावर अतिक्रमण करुन तीन एकर जमीन अधिग्रहण केल्याने शेतकरी, शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

याविरोधात शेतकरी असलेल्या निवृत्त पोलिसाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असुन पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश गुलाब खांडेभराड (रा. कडाची वाडी), गोरक्ष तुकाराम येळवंडे (रा. निघोजे, ता. खेड) तसेच तत्कालीन मोजणी अधिकारी, ले आऊट तयार करणारा आर्किटेक्ट व या सर्वांना मदत करणारा स्थानीक शेतकरी मंगेश निवृत्ती होले (रा. होलेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्यालगत दर्शनी भागात क्र. १८९८ ते १९०३ अशी सहा गटात ही जमीन आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सन २००८ मध्ये या जमिनीतील एका गटाची मोजणी खेड भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याने केली. त्याचबरोबर या सहा गटांच्या आसपास सुध्दा नसलेले तीन एकर क्षेत्र येथेच दाखवले, ज्याच्या मोजणीसाठी अर्जही नव्हता. बनावट मोजणी नकाशे, क पत्रक बनवण्यात आले. त्याद्वारे प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन अकृषिक परवानगी घेण्यात आली. हे करतांना आरोपींनी संगनमताने येथील मुळ शेतकऱ्यांच्या क्षेत्रासह लगतच्या ओढ्यात व रस्त्यावर अतिक्रमण करुन एक हेक्टर २१ आर म्हणजेच तीन एकर क्षेत्र प्लॉट करुन विक्री केले. फिर्यादी पोलिस खात्यात असल्याने त्याबाबत त्याला काहीच कळु दिले नाही. मोजणी कार्यालयात मागोवा घेतला असता यातील बनावट कागदपत्रे हाती आली. त्यानंतर त्यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. त्यांच्यासह लगतचे बाधित शेतकरी न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान कोणताही चुकीचा विषय झालेला नाही. ५० वर्षांची कागदपत्र तपासून जमीन एन. ए. होते. गुन्हा दाखल करणे हा केवळ खोडसाळपणा आहे, असे रमेश खांडेभराड यांनी म्हटले. तपास केल्यावर नेमके काय घडले ते समोर येईल. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news