सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सासवड (ता. पुरंदर) येथील फळबाजारात चिखलामुळे राडारोडा झाला आहे, याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केले. त्याची दखल संबंधित विभागाने दखल घेत एका दिवसातच बाजारात मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, फळबाजारात तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी बाजारपेठ उभारावी, अशी मागणी शेतकर्यांसह व्यापारीवर्गाने केली आहे.
सध्या तरकारी बाजार संत सोपानकाका मंदिरानजीक भरतो. तर फळांचा बाजार सुरवातीला रस्त्यालगत पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजूला भरत होता. त्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने हा बाजार सध्या सासवड न्यायालयासमोरील मोकळ्या जागेत भरवला जातो; परंतु या सखल भागात पाणी साचून सर्वत्र चिखल झाला आहे आणि या चिखलात सध्या हा बाजार सुरू आहे.
चिखलात कसेबसे उभे राहून शेतकरी आपला माल विकत आहेत, तर दुसरीकडे व्यापार्यांना खरेदी केलेला माल प्रतवारी करून पॅकिंग करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे व्यापार्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, बाजारभावात घसरण झाली आहे. चारचाकी वाहनांना तर अक्षरशः सर्कशीचा खेळ करत या बाजाराच्या बाहेर काढावे लागत आहे.
चिखलामुळे शेतकरी या बाजारातून धड चालूही शकत नाहीत. शेतकरी डोक्यावर शेतीमालाचे पोते किंवा कॅरेट घेऊन जात असताना चिखलात घसरून पडत असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने गुरुवारी (दि. 28) प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने बाजारात मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या तात्पुरत्या डागडुजीबद्दल शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या ठिकाणी कायमस्वरूपीची उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकर्यांसह व्यापारीवर्गातून होत आहे.
सासवडच्या बाजारात वर्षानुवर्षे लाखो रुपयांची उलाढाल होते. ग्राहकदेखील दूरवरून खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, आजपर्यंत हक्काची बाजारपेठ इथे उपलब्ध झालेली नाही. मधल्या काळात सासवड बाजारपेठेत सुसज्ज शेड उभारण्यात आले. मात्र, जागा अपुरी पडू लागल्याने बाजार शहराबाहेर नेण्यात आला. त्या ठिकाणी सध्या किरकोळ विक्री सुरू आहे.
हेही वाचा