पाऊस गेला कोणीकडे, पेरण्या खोळंबल्या चोहीकडे; जगाचा पोशिंदा शेतकरी चिंताग्रस्त

पावसाच्या प्रतीक्षेत असलेली काळी माय.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेली काळी माय.
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात ओतूर व माळशेज पट्ट्यात ओतूर, उदापूर, बनकरफाटा, डिंगोरे, नेतवड, मांदारने, या गावांमध्ये शुक्रवारी (दि. २४) वरुणराजाने अल्पप्रमानात हजेरी लावली; मात्र एव्हढ्याशा पावसाने जमिनीवरील ढेकळे फुटनेही मुश्किल असून पेरणीयोग्य ओल झाली नसल्यामुळे व पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे "पाऊस गेला कोणीकडे,पेरण्या खोळंबल्या चोहीकडे" अशी काहीशी स्थिती पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात निर्माण झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर पुरेशा प्रमाणात पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकऱयांनी कशीबशी मशागत करून जमीन पेरणीयोग्य केली आहे.

बी-बीयाने खरेदी करून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, परंतु आकाशात दररोज ढग जमा होतात व गायब होतात. हा लपंडाव गेल्या २५ दिवसांपासून सुरू असल्याने या परिसरात सर्वच्या सर्व पेरण्या खोळंबल्या आहेत. पुरेशा प्रमाणात पावसाचा पत्ताच नसल्याने विहिरी, कूपनलिका, तळी यांच्या पाणी पातळीत तसूभरही वाढ झालेली नाही, तर ओढे, नाले कोरडेठाक पडल्याचे विदारक दृश्य सर्वत्र आहे. अनेक दिवसांपासून फक्त काळेकुट्ट ढगाचे दर्शन घडत असल्याने व पाऊस पडायचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात दरवर्षी पावसाचे आगमन होत असते, परंतु यंदा पाऊस वारंवार हुलकावणी देत आहे. वेळेत पेरणी झाली तर पुढच्या पिकांना देखील याचा फायदा होऊ शकतो.

उदापूर परिसरात काही निवडक शेतकऱ्यांनी थोड्याशा पावसावर पेरणी केली आहे. त्यांचेवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी अद्यापही बाकी आहे. माळशेज पट्ट्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठीकेकरवाडी, डुंबरवाडी, खामुंडी या परिसरात अद्याप पर्यंत पाऊस बीज पेरण्यायोग्य झाला नाही, तसेच अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणारे कोपरे, मांडवे, जांभूळशी या परिसरात पावसाचे अतिअल्प प्रमाण असल्याने शेतकरी अजूनही चिंताग्रस्त असून आजही त्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तसेच त्या भागात शेत मशागतीचीदेखील कामे खोळंबली आहेत. परिणामी पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत. येथील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या शेजारच्या गावात जाऊन रोजंदारीवर शेतीची कामे करावी लागत आहेत. या भागात पाऊस झाल्यास कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे मांडवे येथील पोलीस पाटील बबन दाभाडे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news