पिंपरी-चिंचवड ‘आयटीआय’मधून घडताहेत उद्योजक

पिंपरी-चिंचवड ‘आयटीआय’मधून घडताहेत उद्योजक
Published on
Updated on

दीपेश सुराणा: 

पिंपरी : दहावीनंतर करिअरचा शेवटचा पर्याय म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणार्‍या 'आयटीआय'ला 'अच्छे दिन' आले आहेत. निगडी-यमुनानगर येथील पिंपरी-चिंचवड 'आयटीआय'मध्ये प्रशिक्षण घेणार्‍यांपैकी दहा टक्के विद्यार्थी उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहून इतरांचा आधार बनले आहेत. ही सकारात्मक बाब लक्षात घेऊन 'आयटीआय'ने उद्योजक घडविण्यासाठी चालू वर्षापासून 'उद्यमशिक्षा' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे उद्योजकतेचे धडे दिले जात आहेत.

निगडी-यमुनानगर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (पिंपरी-चिंचवड) कार्यरत आहे. येथे एकूण 15 प्रकारचे औद्योगिक व व्यावसायिक अभ्यासक्रम सध्या शिकविले जातात. दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी निराश होऊन उमेद हरवून बसलेले असतात. या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी येथे सुतारकाम, नळ कारागीर, पत्रे कारागीर, वेल्डर, गॅस टंगस्टन आर्गन वेल्डींग आणि साचेकार (फाऊंड्री) हे अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फळे व भाज्यांवर संस्करण (फ्रुट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग), आरेखक यांत्रिकी (ड्रॉफ्टस्मन मेकॅनिक), आरेखक स्थापत्य (ड्रॉफ्टस्मन सिव्हिल), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), जोडारी (फिटर), यंत्र कारागीर, मशिनिस्ट ग्राइंडर, कातारी (टर्नर), ऑपरेटर अ‍ॅण्ड मशिन टूल आदी अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत.

आयटीआयमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना 'उद्यमशिक्षा' उपक्रमाशी जोडले जात आहे. या उपक्रमात 'उद्योजक कसा घडवायचा', याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी 32 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येतात. या प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याशिवाय, आयटीआय उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी देखील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

विद्यार्थ्यांची मशीनिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्नर, फीटर आदी ट्रेडला पहिली पसंती असते. तुलनेत प्लंबर, कारपेंटर, शीटमेटल वर्कर आदी अभ्यासक्रम शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कमी कल असतो. मात्र, त्यांना उद्योगांतून चांगली मागणी मिळते, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य शशिकांत साबळे यांनी दिली.

स्वयंरोजगार कौशल्यावर भर
बदलत्या काळानुसार आयटीआयमधील प्रत्येक अभ्यासक्रमासोबत स्वयंरोजगार कौशल्य हा स्वतंत्र विषय सध्या शिकविण्यात येत आहे. त्यामध्ये संगणकाचे प्राथमिक ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, कामगार कायद्यांविषयी माहिती, सुरक्षितता नियम आणि इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात.

प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी प्रशिक्षण
आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नये, यासाठी दोनच वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत सध्या अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान शिकविण्याबरोबरच दररोज 5 तास प्रात्याक्षिक ज्ञानावर भर दिला जातो. तसेच, प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याशिवाय, अभ्यासक्रमादरम्यान उद्योगांमध्ये 3 ते 4 भेटी देण्यात येतात.

आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सध्या अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 572 जागा उपलब्ध आहेत. पुढील वेळापत्रक जाहीर होणे बाकी आहे. 1 ऑगस्टपासून प्रत्यक्ष आयटीआयला सुरुवात होणार आहे. आयटीआय प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांतून उद्योजक घडविण्यासाठी चालू वर्षापासून उद्यमशिक्षा उपक्रम सुरू केला आहे.
– शशिकांत साबळे, प्राचार्य,
पिंपरी-चिंचवड आयटीआय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news