Pune : शेतकरी कृती समिती करणार गांधीगिरी

Pune : शेतकरी कृती समिती करणार गांधीगिरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  यंदा दुष्काळी स्थिती असताना सभासदांच्या उसाचे प्राधान्याने गाळप होणे आवश्यक असताना सोमेश्वरने गेटकेन ऊस आणला. सभासदांचा ऊस मागे राहिल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या प्रश्नी आता शनिवारी (दि. 3) शेतकरी कृती समिती संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांचा नारळ देऊन सत्कार करत गांधीगिरी करणार आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कारखान्याने 90 दिवसात 8 लाख 17 हजार टन उसाचे गाळप केले. त्यात 1 लाख 90 हजार टन ऊस गेटकेनचा आणला. सभासदांच्या 6 लाख 27 हजार ऊस गाळप करण्यात आले. गेटकेन बंद करून सभासदांचा ऊस आणावा, परिपत्रकानुसार ऊस तोड व्हावी या मागणीचे निवेदन समितीने दिले होते. तरीही गेटकेन बंद केला नाही. परिणामी गुरुवारी (दि. 1) पुन्हा निवेदन देण्यात आले.

गतवर्षी कारखान्याने 12 लाख 56 हजार टनाचे गाळप केले होते. यंदा सभासदांचा अद्याप 6 ते 7 लाख टन ऊस शिल्लक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दोन लाख अधिकचे गाळप होईल. गेटकेनचा कमी रिकव्हरीचा ऊस आणत आणि त्यांना सभासदांएवढा दर देत कारखाना कोणाचे हित साधतो आहे, असा सवाल समितीने केला. ऊसतोड वेळेत न झाल्याने दुबार पिक घेता आले नाही. ऊस न गेल्याने टनेज घटले. त्यामुळे दुहेरी नुकसानीला शेतक?यांना सामोरे जावे लागल्याचे समितीचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्यासाठी समिती दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता कारखान्यावर जाणार आहे. सभासदांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काकडे यांनी केले आहे. संचालक मंडळ गेटकेनधार्जिणे असून, सभासद बहुसंख्येने उपस्थित राहिले नाहीत तर समिती यापुढे नाइलाजास्तव वेगळा निर्णय घेईल, असे काकडे यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news