शहापूर जंगलातील बोरे ठरताहेत रोजगाराचे साधन | पुढारी

शहापूर जंगलातील बोरे ठरताहेत रोजगाराचे साधन

शहापूर/राजेश जागरे :  शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये बोरांना बहर आला असून ही आंबट गोड बोरे येथील आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचे साधन ठरू लागली आहेत.

जसजसा वसंत ऋतु सुरू होत आहे, तसतसे निसर्गात वेगळे बदल घडताना दिसत आहेत. या बदलत्या वातावरणात असे एक गुणकारी फळ आहे.जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आणि फलदायी आहे. इतर देशांत या फळाला जुज्यूब, तर भारतात ‘बोर’ या नावाने ओळखले जाते. ग्रामीण भागात या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच डोंगरामध्ये सर्वाधिक हे फळ उपलब्ध असते. हिरव्या आणि तपकिरी रंगाचे हे फळ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर देखील बहाल केले जाते. हे फळ सहजरित्या आपल्याला खाता येते. तसेच पचन सुधारण्यास आणि चांगली झोप घेण्यास देखील मदत करते. बोर अगदी लहान असले, तरी आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.

शहापूर तालुक्यात तानसा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर बोरांचा सडा रस्त्याच्या दुतर्फा पडलेला दिसतो. या ठिकाणी फिरावयास येणारे पर्यटक बोरं खाण्याचा आस्वाद घेत असतात, तसेच तालुक्यातील वैतरणा, भातसा पठार, पठार, टाकीपठार, अघई, दहिवली, नेहरोली, लेनाड, नडगाव या परिसरात देखील बोरीची झाडं मोठ्या प्रमाणावर दिसतात. ही झाडं वनविभाग आता लागवड करतांना दिसत नाही. परंतु पूर्वी लावण्यात आलेल्या रोपांपासून या झाडांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झालेली दिसत आहे. या झाडाला लागवड केल्या नंतर नियमित पाण्याची आवश्यकता नसते फक्त याचं वनव्यापासून बचाव करणे गरजेचे आहे, या जंगली बोरांमुळे येथील आदिवासीना रोजगार देखील मिळतो.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात बाजार पेठात जंगली बोरं विक्री साठी येत असतात पण वनविभागाने याकडे लक्ष दिले तर झाडाच्या खाली पडलेला बोरांचा सडा खराब होतो. त्यांच्यावर प्रकिया उद्योग उभे केले तर नक्की स्थानिक महिला बचतगट यांना देखील आर्थिक फायदा होईल शिवाय जंगल सफारी करण्यासाठी येणार्‍या मुंबई, ठाणे, गुजरात, पुणे, येथील पर्यटकांना देखील बोरांचा आस्वाद घेता येईल.

बहु्गुणी बोरं अजारांवर गुणकारी

बोर हे फळ जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माचे एक पॉवरहाउस मानले जाते. त्यामध्ये व्हिटॅमिन सीची सर्वाधिक मात्रा असते. 100 ग्रॅम बोरामध्ये सुमारे 69 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतो. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी तयार होऊ शकत नसल्यामुळे ते नैसर्गिकरित्या उपलब्ध फळांमधून घ्यावे लागते, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कार्य करते.

रक्तदाबावर नियंत्रण

लोह आणि फॉस्फरसची चांगली मात्रा असल्याने बोर रक्ताभिसरण प्रक्रियेवर नियंत्रित ठेवते. अशक्तपणा देखील नियंत्रित होऊ शकतो. बोरामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाबास गुणकारी ठरते. कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते.

Back to top button