Anant chaturthi 2023 : अलोट गर्दीच्या उत्साहात बाप्पांना निरोप; मिरवणुकीची सांगता 30 तास 28 मिनिटांनी!

Anant chaturthi 2023 : अलोट गर्दीच्या उत्साहात बाप्पांना निरोप; मिरवणुकीची सांगता 30 तास 28 मिनिटांनी!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याची परंपरा सोडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टने दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी उचललेले ऐतिहासिक पाऊल, यंदा दोन्ही दिवस कोसळलेल्या पावसाच्या सरी, ढोल-ताशा पथकांची व त्यांच्यातील वादकांची वाढलेली संख्या, पोलिस बंदोबस्त असला तरी मंडळांतील अंतर कमी करण्यासाठी त्यांचे तोकडे पडलेले प्रयत्न, ही यंदाच्या मिरवणुकीतील ठळक वैशिष्ट्ये ठरली. गतवर्षापेक्षा मिरवणुकीचा वेळ यंदा एक तासाने कमी झाला असून, यंदाची मिरवणूक 30 तास 28 मिनिटांनी संपली.

लक्ष्मी रस्त्यासोबतच प्रमुख मंडळांच्या मिरवणुका टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता या मार्गांवरून तसेच उपनगरांतून निघाल्या. 466 मंडळांसोबतच उत्साही पुणेकरांनी, परगावाहून आलेल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. आकर्षक विद्युतरोषणाई, दिव्यांची होणारी उघडझाप अशा रीतीने सजविलेले रथ लांबून लोकांचे लक्ष वेधून घेत होते.

त्याबरोबर विविध पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे मंडळांनी सादर केले होते. लेझीम व ढोल-ताशा पथकांनी केलेला गजर, पारंपरिक वेशभूषा केलेली तरुण-तरुणींची पथके, मोबाईलवर सर्व दृश्ये टिपणारी तरुणाई, यामुळे मिरवणुकीला रंग चढला होता. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करीत नागरिकांनी भक्तिभावाने गणरायाला निरोप दिला.

मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात केली. मानाची पहिली पाच मंडळे गेल्यानंतर मानाच्या शेवटच्या तीन मंडळांपैकी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टने यंदा प्रथमच स्वतंत्रपणे लवकर मिरवणुकीत भाग घेतला. मिरवणुकीत शेवटचा मान असलेली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ यांच्यासह प्रमुख मंडळे त्यांच्या आकर्षक देखाव्यांसह दरवर्षीप्रमाणे सायंकाळी मिरवणुकीत भाग घेण्यासाठी सज्ज झाली. अन्य गणेश मंडळांमुळे ही मंडळे रात्री अकरानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली.

मानाची मंडळे टिळक चौकापाशी पोहचेपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजतच लोकांनी 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत निरोप दिला. दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत 26 मंडळेच लक्ष्मी रस्त्यावरून पुढे गेली होती. रात्री बारानंतर डीजे बंद झाला, तरी पारंपरिक वाद्ये वाजत राहिली. सकाळी पुन्हा डीजेबरोबरच ढोल पथकांचा निनाद सुरू झाला. त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरून शंभरपेक्षा अधिक मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. सकाळी पुन्हा पावसाने जोरदार सलामी झाली. केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्त्याचा ताबा डीजेवर वाजणार्‍या उडत्या चालीच्या गाण्यावर थिरकणार्‍या तरुणाईने घेतला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news