Pune News : पोलिस आयुक्तांनी शपथपत्र द्यावे! सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी प्रकरण | पुढारी

Pune News : पोलिस आयुक्तांनी शपथपत्र द्यावे! सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी प्रकरण

पुणे : सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीप्रकरणी दोन पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांनी तपासात दिरंगाई केली आहे. न्यायालयाने निर्देश देऊनही संस्था सचिवावर कारवाई केली नाही. आदेशाचे उल्लंघन करण्यात पोलिस प्रशासनासह लोकप्रशासनाचा रोल आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी तीन आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी शैक्षणिक व सामाजिक उद्देशाने स्थापन केलेल्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे मुख्यालय पुण्यात असून, संस्थेच्या देशभर शाखा आहेत. संस्थेतील अनियमिततेबाबत याआधी सुनील गोखले यांनी संस्था सचिव मिलिंद देशमुख यांची आयकर विभागाने चौकशी करावी म्हणून, तर रानडे इन्स्टिट्युटचे विश्वस्त सुनील भिडे यांनी उच्च न्यायालयात 16 एकर जमीन प्रकरणात याचिका दाखल केली होती.

अनियमितता आणि नियमबाह्य जमीन विक्री प्रकरणावर दै. ‘पुढारी’ने प्रकाशझोत टाकून वृत्तमालिका प्रसिध्द केली होती. यानंतर संस्थेच्या पदाधिकार्‍यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने बाजू समजून घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नापसंती व्यक्त केली.

कुलगुरू संशयाच्या फेर्‍यात…

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या आवारात असलेल्या गोखले इन्स्टिट्युटचे विद्यमान कुलगुरूही अनियमिततेच्या प्रकरणात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. काही जमिनींचे व्यवहार त्यांच्या साक्षीने झाले असून, त्यात त्यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समजते. कुलगुरूंची नियुक्ती यूजीसी नियमानुसार झालेली नाही. यूजीसीकडून मिळणारा कोट्यवधींचा व्यवहार बेहिशेबी असून, त्यात सचिव आणि कुलगुरूंचा हात असल्याचे समजते.

हेही वाचा

लावा मराठी पाट्या!

अ‍ॅरॉनमध्ये जीप ‘न्यू कंपास एसयूव्ही’चे अनावरण

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार; कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Back to top button