पुणे : उत्खननात शिवकालीन शिवपट्टण गावाचे झाले दर्शन

राजगडाच्या पायथ्याला शिवपट्टण परिसरातील खोदकामात सापडलेले शिवकालीन आधुनिक दर्जाच्या बांधकामाचे नमुने.
राजगडाच्या पायथ्याला शिवपट्टण परिसरातील खोदकामात सापडलेले शिवकालीन आधुनिक दर्जाच्या बांधकामाचे नमुने.

दत्ताजी नलावडे

वेल्हे : राजगड किल्ल्याच्या पायथ्याला गुंजवणी नदीच्या तीरावरील शिवपट्टण परिसर हे शिवकाळात स्वतंत्र गाव असल्याचे पुरातत्त्व खात्याने सुरू केलेल्या उत्खननात पुढे येऊ लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानव कल्याणकारी कार्याची साक्ष देणारे दर्जेदार बांधकामाचे अवशेष, शिवराई नाणे, उखळ अशा वस्तूंसह चिरेबंदी दगड, विटा, कौले आदी साहित्य तेथे सापडत आहे.

परकियांच्या तसेच ऐतिहासिक कागदपत्रांत शिवपट्टण स्थळाचा उल्लेख आहे. राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या उत्खननास 3 मार्च रोजी सुरुवात झाली. एक एकर क्षेत्रात उत्खनन करत असताना आसपासच्या परिसरातही बांधकामाचे अवशेष सापडले. त्यामुळे शेजारच्या क्षेत्रावर उत्खनन करण्यात येत आहे. अवघ्या तीन आठवड्यांत शिवकालीन बांधकामाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.

सुरुवातीला बहामनी काळातील नाणी सापडली. त्यानंतर मंगळवारी (दि. 22) शिवराई नाणे सापडले आहे. शिवपट्टण परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामाचे अवशेष सापडत असल्याने या ठिकाणी शिवकाळात वसाहत असलेले स्वतंत्र गाव असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने शिवपट्टणकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वाहणे यांच्या देखरेखीखाली शिवपट्टण वाडा स्थळ व गुंजवणी नदीच्या तीरावर शिवरायांच्या पत्नी महाराणी सईबाई समाधी स्थळाचे उत्खनन सुरू आहे.

विजेची सोय

महावितरण कंपनीने रातोरात तारा टाकून खांब उभे करून उत्खनानासाठी वीज आणली आहे. मात्र पुरातत्त्व खात्याने विजेसाठी मीटर घेतला नाही. त्यामुळे तेथे वीज सुरू झाली नाही.

शिवकाळातील आधुनिक गाव

मुरुमदेवाचा डोंगर जिंकून शिवरायांनी राजगड किल्ला बांधला. उंच डोंगरकडे तासून चौफेर अभेद्य तटबंदी उभारली. राजगड हा जगातील उत्कृष्ट डोंगरी किल्ला आहे. तर शिवपट्टण हे शिवकाळातील आधुनिक गाव असल्याचे खोदकामात पुढे आले आहे. मध्यम आकाराची निवासस्थाने, चिरेबंदी दगड, विटांच्या भिंती, दगडी फरसबंदी, भूमिगत बांधकामे, स्वयंपाकघर आदी वास्तू सापडत आहेत. ऊन, अतिवृष्टीचा सामना करणारे दर्जेदार बांधकाम आहे. वाड्याच्या परिसरातील शिवरायांच्या फळबागांच्याही पाऊलखुणा उजेडात आल्या आहेत.

पुरातत्त्व खात्याच्या वतीने उत्खनन केले जात आहे. याबाबत पुरातत्त्व खात्यामार्फत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
                                                                        – शिवाजी शिंदे, तहसीलदार, वेल्हे

महाराणी सईबाईसाहेब समाधी स्थळ तसेच शिवपट्टण वाड्याच्या ठिकाणचे संपूर्ण उत्खनन करून त्यांच्या अवशेषांचे पुरातत्त्वीय संशोधन केले जाईल. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
                                                         – विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्त्व विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news