सूर्यही घेतो श्वासोच्छ्वास : आयुकातील शास्त्रज्ञाने सांगितली रंजक माहिती

सूर्यही घेतो श्वासोच्छ्वास : आयुकातील शास्त्रज्ञाने सांगितली रंजक माहिती

पुणे : धगधगणारा सूर्यही माणसासारखाच श्वासोच्छ्वास घेत असतो. त्याच्या पोटात मोठा हायड्रोजन बॉम्ब आहे. त्याचा परीघ तब्बल 7 लाख किलोमीटर लांबीचा असून, पृष्ठभागावर 6 हजार अंश, मध्यभागावर 10 लाख अंश तर बाहेच्या परिघात 15 लाख अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. ही आणि अशी बरीच मौलिक माहिती आदित्य सूर्ययानाच्या मोहिमेतून मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यातील काही भागाची माहिती पुण्यातील आयुका संस्थेतील शास्त्रज्ञांनी 'पुढारी'ला दिली.

सतत आग ओकणार्‍या सूर्यावर नेमके काय सुरु असते, याबद्दल सामान्य नागरिकांप्रमाणे शास्त्रज्ञांनाही कुतुहल आहे. त्यातूनच आपल्या देशाने आदित्य यान अवकाशात पाठवले. या यानाने सूर्याची काही प्राथमिक निरीक्षणे पाठवली आहेत. ती अंगावर रोमांच उभे राहतील अशीच आहे. भारतीय अवकाश संस्था म्हणजेच 'इस्रो'मध्ये मोठी टीम आहे, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या आयुका संस्थेत या यानातील एक पेलोड तयार करणारे 22 शास्त्रज्ञांचे पथकही आदित्यने केलेल्या निरीक्षणांवर काम करते आहे. त्यात शास्त्रज्ञ प्रा. डॉ. दुर्गेश त्रिपाठी, अधिष्ठाता प्रा. डॉ. रामप्रकाश हे प्रामुख्याने काम करीत आहेत. डॉ. त्रिपाठी यांच्याशी 'पुढारी'ने संवाद साधला.आदित्य एल-1 हे यान नेमके काय काम करीत आहे यासह सूर्यावरील वातावरणाचे कुतुहल शास्त्रज्ञांनाही कसे आहे. याची माहिती त्यांनी दिली.

सौर वादळांमुळे सूर्य धगधगतो अन श्वासही घेतो…

धगधगणार्‍या सूर्याला धडधडणारे हृदय असेल का, तो श्वाच्छोच्छ्वास घेतो का.. असे प्रश्न आजवर आपण ऐकत होतो, मात्र ही बाब खरी आहे, सौरसाखळी (सायकल) दर अकरा वर्षांनी बदलत असते. त्यामुळे तेथे सौरवादळे निर्माण होवून वातावरण आकुंचन-प्रसरण पावते.त्यामुळे सूर्य सतत पेटलेल्या अग्निकुंडाप्रमाणे धगधगत असतो. त्याची ही क्रिया मानवी श्वाच्छोच्छ्वासासारखीच वाटते.

सूर्यावरच्या तापमानात प्रचंड तफावत का?

डॉ. त्रिपाठी म्हणाले, 'सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान कमीतकमी 6 हजार अंश सेल्सिअस इतके आहे, मात्र मध्यभागावर 10 लाख तर बाहेरच्या परिघात तब्बल 15 लाख अंश सेल्सिअसपर्यंत आहे. याचे नेमके कारण काय याचा शोध शास्त्रज्ञांना घ्यायचा आहे.आदित्य हे याच कारणांचा शोध घेत आहे.'

अतिनील अन् क्ष किरणांचा अभ्यास सुरू

सूर्यावर अतिनील किरणांची (अल्ट्राव्हायोलेट रे) आणि क्ष किरणांची (एक्स रे) उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो आहे, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत. ही दोन्ही किरणे आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र सूर्याच्या पांढर्‍या प्रकाशात सप्तरंग आहे. त्यात या दोन किरणांचा समावेश असतो. त्यासाठी पुण्यातील आयुकाने ( आंतरराष्ट्रीय खगोल आणि खगोलभौतिकी संस्थेने) एक पेलोड यंत्रणा तयार केली. त्याचे नाव अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप आहे. याव्दारे हा अभ्यास केला जात आहे.

अंतराळात मानवाला कधी पाठवायचे, याचा येणार अंदाज

प्रा.त्रिपाठी म्हणाले, 'आदित्य यान हे पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. त्याला एल-1 पॉईंट म्हणतात. हा पॉईंट असा आहे. जेथे यान स्थिर आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीचा त्यावर फार परिणाम होत नाही. सूर्यावरील वातावरणाचा सखोल अभ्यास येत्या मार्चपासून सुरु होईल. त्यामुळे मानवाला अवकाशात नेमके कधी पाठवावे ? याचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. तसेच सुर्याची अनेक गुपिते उघड होतील.'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news