वारसा : स्वागतार्ह पाऊल | पुढारी

वारसा : स्वागतार्ह पाऊल

डॉ. वि. ल. धारुरकर, ज्येष्ठ विचारवंत

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अजिंक्य अशा 11 गडांची जागतिक वारसास्थळांसाठी शिफारस केली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा अधिक सुसंपन्न करणारी आहे.

जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा वारसास्थळांना ‘युनेस्को’च्या वतीने जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केले जाते. अशी वारसास्थळे भारतामध्ये 42 असून, जगामध्ये त्यांची संख्या 1,199 इतकी आहे. वारसास्थळांच्या संख्येमध्ये जगात भारतापेक्षाही इटाली, चीन इत्यादी राष्ट्रे पुढे आहेत. खरे पाहता, समृद्धसंपन्न असा सांस्कृतिक वारसा असूनही गेल्या 75 वर्षांत भारताने या सांस्कृतिक स्थळांच्या बाबतीत फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळे किती तरी संपन्न, समृद्ध सांस्कृतिक वारसास्थळे अजूनही अंधारातच चाचपडत आहेत.

याबाबतीत 1980 च्या दशकात भारतीय पुरातत्त्वच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अंजिठा, वेरूळ यासारख्या जगद्विख्यात लेण्यांचा जागतिक वारसास्थळांत समावेश करण्यात आला. आता विद्यमान राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अजिंक्य अशा 11 गडांची जागतिक वारसास्थळांसाठी शिफारस केली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा अधिक सुसंपन्न करणारी आहे. त्याहीपलीकडे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणणारी आहे. जागतिक वारसा म्हणून महाराष्ट्रातील गड-कोटांची नोंद झाल्यास महाराष्ट्रातील पर्यटनाचा परतावा गतीने वाढणार आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नव्या रोजगार संधीची उपलब्धी होणार आहे.

भारत बघायला येणार्‍या पर्यटकांना आजही पहिले आकर्षण असते ते राजस्थानचे. राजस्थानातील मोठमोठे किल्ले, युद्धस्थळे, आलिशान राजवाडे पाहून त्यांचे डोळे दीपून जातात. त्यानंतर ते ताजमहल पाहतात. दिल्लीमधील काही जुन्या इमारती पाहतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात. देशात येणार्‍या विदेशी पर्यटकांपैकी 5 ते 7 टक्के पर्यटक फक्त अजिंठा किंवा वेरूळ पाहण्यासाठी दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत येतात. पूर्वी दिल्ली, जयपूर, उदयपूर आणि औरंगाबाद ही जी विमानसेवा होती ती 30 वर्षांपासून खंडित करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना अजिंठा-वेरूळचे वैभव काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या गड-कोटांकडेही पर्यटकांचे दुर्लक्ष होते.

व्हिएतनामचे मुक्तिदाता स्वातंत्र्ययोद्धे होचीमीन यांनी भारतात आल्यानंतर ‘मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहावयाचा आहे,’ अशी विनंती केली होती, तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानाने रायगड पाहण्यासाठी संधी उपलब्ध करू न देण्यात आली. तेथील मूठभर माती घेऊन ते आपल्या देशात गेले आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना गनिमी युद्ध लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली, असे अभिमानाने सांगितले. छत्रपती शिवाजीराजे हे युगपुरुष होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेले स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपतींचे 300 हून अधिक किल्ल्यांपैकी 200 किल्ले स्वत: महाराजांनी उभारलेले आहेत. पेशवाई पडल्यानंतर इंग्रजांनी सत्ता हातात घेताना या गड-कोटांना आगी लावून भेसूर करून टाकले. त्यानंतर महाराष्ट्रातील गड-कोटांच्या संरक्षण, संवर्धन या कामाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा गडसंवर्धनाच्या प्रक्रियेला चालना दिली जाऊ लागली; पण तरीदेखील पुरातत्त्व खात्याकडे बघण्याचा नकारात्मक द़ृष्टिकोन आणि अपुरी वित्तीय तरतूद ही कायम राहिली. या पार्श्वभूमीवर शिवकाळातील 11 गड-कोटांचे संवर्धन आणि विश्व वारसास्थळांमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी केलेले प्रयत्न स्वागतार्ह आणि स्पृहणीय म्हणावे लागतील.

या गड-कोटांच्या व्यवस्थापनाचा, त्यांच्या नियोजनाचा, त्यातील पद्धतशीर नियंत्रण, संतुलन आणि व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला असता असे दिसते की, मध्ययुगीन काळातही अत्यंत प्रगत अशी संरक्षण व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकालामध्ये विकसित केली होती. त्यामुळे मध्य आशियातून भारतावर चालून आलेल्या मुघलांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची ध्वजा गगनामध्ये उंच उंच फडकावण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. महाराष्ट्रातील गड-कोटांच्या वैभवांचा इतिहास विदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक यांच्यासमोर आणण्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने करावयास हव्यात.

पहिले म्हणजे, गड-कोटांच्या सुरक्षा आणि वैभवाच्या सुवर्णकडा पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. मुख्य शहरापासून गड-कोटांपर्यंत उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे तयार करावे लागेल. रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक यामध्ये ज्या समन्वयाची गरज असते तशा समन्वयाची व्यवस्था महाराष्ट्रात नसल्यामुळे रायगडावर पोहोचणे किंवा प्रतापगडावर पोहोचणे, शिवनेरीवर पोहोचणे, राजगडावर पोहोचणे याबाबी म्हणजे पर्यटकांना साहस वाटू लागतात. खरे तर, या सर्व गड-कोटांना एकमेकांशी जोडून त्यांचे पर्यटनशास्त्राप्रमाणे सर्किट तयार केल्यास तेथे पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गड-कोटांचे पावित्र्य राखण्यासाठी, तेथील जिवंत इतिहास बोलका करण्यासाठी कल्चरल लूकआऊट नोटीस म्हणजे सांस्कृतिक इतिहासाचे पट लोकभाषेमध्ये उलगडले पाहिजेत. इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये या गड-कोटांचा थोडक्यात आणि प्रभावी असा इतिहास प्रकट केला पाहिजे. अलिकडे काही सीडीज् आणि व्हीसीडीज्ही काही गड-कोटांबद्दल उपलब्ध आहेत; पण ते प्रकाशाच्या वाटेपासून दूरच आहेत. गड-कोटांच्या बाबतीत समग्र पट उलगडणार्‍या पुस्तकांची यादी करावयाची झाल्यास तीही फारशी नाही. आपणास गड-कोटांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकण्यासाठी नव्या साहित्याची आवश्यकता आहे. विशेषत:, असे साहित्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांना खेचण्यासाठी म्हणून अव्वल दर्जाच्या इंग्रजीमध्ये आणि तेवढेच गतिमान व आक्रमक पद्धतीने लिहिले गेले पाहिजे.

कर्नल टॉड यांच्या राजस्थानच्या पुस्तकाचा आदर्श ठेवून महाराष्ट्रातील गड-कोटांचा इतिहास लिहिला गेला, तर युरोपातील पर्यटकांचे लोंढे महाराष्ट्राकडे वळवता येऊ शकतील. हे काम तसे अवघड वाटत असले, तरी अशक्य आहे, असे नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गड-कोटांच्या सांस्कृतिक इतिहासातील मर्मभेदक अशा अंत:प्रवाहाचे नव्याने आकलन करणे. उदाहरणार्थ, राजगडावरील बाल किल्ल्याचे काय वैशिष्ट्य आहे, पन्हाळगडावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा युद्ध क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे, प्रतापगडावरील युद्ध क्षेत्राचे स्थान कोणते आहे, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने पन्हाळगड ओलांडून विशाळगडाकडे कूच केली, या सर्व रोमहर्षक प्रसंगांचे अलीकडे चित्रपटांतून प्रकटीकरण होत आहे. परंतु, वॉर टुरिझम किंवा युद्ध पर्यटन याद़ृष्टीने विचार करता, 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला तोरणा, 1795 मध्ये मराठ्यांनी निजामाला धूळ चारत जिंकलेली खर्ड्याची लढाई यासारख्या थरारक कथा तितक्याच समर्पकपणाने इंग्रजी भाषेतून जागतिकस्तरावर प्रसारित व्हायला हव्यात.

1646 पासून 1795 पर्यंत मराठ्यांनी केलेली पराक्रमांची शर्थ पाहता असे दिसते की, मराठ्यांनी गड-कोटांच्या रक्षणातून, संरक्षणातून एक जबरदस्त शक्ती मध्ययुगीन भारतामध्ये निर्माण केली होती. बी. एन. आपटे यांच्या ‘मराठा नॉव्हल पॉवर’ या ग्रंथामध्ये त्यांनी मराठ्यांनी चंद्रगुप्त मौर्यानंतर कशा पद्धतीने आरमार सज्ज केले होते याचे अत्यंत समर्पक वर्णन आलेले आहे. युद्धनौकांची उभारणी, त्यांची प्रगत रचना, त्यांचा पोर्तुगीजांविरुद्ध मराठ्यांनी केलेला उपयोग पाहता मराठ्यांचे नौदल किती सामर्थ्यवान होते याची प्रचिती येते. शासनाने जागतिक वारशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवून एक मोठे पाऊल टाकले आहे; पण तेवढ्यावर समाधान न मानता स्वराज्याचे नागरिक म्हणून तमाम मराठी जनांनी गड-कोटांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आपले योगदान दिले पाहिजे.

Back to top button