पुणे : पुढारी वृत्तसेवा : बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणार्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकीदेखील जप्त करण्यात आली आहे. नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा, राहुरी, जि. अहमदनगर), चेतन सीताराम खैर (रा. नाझरे कडेपठार, खैरेवाडी ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासोबत दुसर्या दुचाकीवरील एक व्यक्ती हा अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबरी चोरी, गुन्ह्यांचा तपास करीत असताना बोपदेव घाट परिसरात पोलिसानी सापळा रचून बोपदेव घाटमाथ्यावर साध्या वेषात रोडच्या बाजूला थांबून संशयित वाहने व इसमांचा शोध सुरू केला. तेवढ्यात दोन दुचाकी वाहनांवर तीन व्यक्ती सासवडकडून पुण्याच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. त्यातील एका दुचाकीला पुढील व मागील बाजूस नंबर प्लेट नव्हती. ते घाटमाथ्यावर फिरत असणार्या लोकांकडे पाहात आपापसात बोलत होते. त्यामुळे त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे एक दुचाकी पल्सर आणि एक धारदार चाकू मिळून आला. सापडलेल्या आरोपीचा कसून तपास केला असता बोपदेव घाटात आलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटल्याचे आणि त्यांची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त आर.राजा, सहायक पोलिस आयुक्त शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, विशाल मेमाणे, नीलेश देसाई, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा