

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता वांग्याचे भरीत, बाजरीचा रोडगा, कांद्याची पात, पुरणपोळीचा नैवद्य खंडोबाला दाखवून झाली. तब्बल दोन हजार किलो वांग्याचे भरीत अन् भाकरीचा नैवेद्य या वेळी करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर मार्गशीर्ष प्रतिपदेला चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली होती. पाच दिवस पूजा-अभिषेक, विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रम, वाघ्या-मुरुळी व लोककलावंतांचा भक्तिगीते, घडशी समाजाचे दिवस-रात्र सुमंगल सनई-चौघडावादन, देवदीपावली, तेलहंडा, देवाला तेलवण-हळद अशा धार्मिक विधींनी सहा दिवस वातावरण मल्हारमय झाले होते.
बुधवारी (दि. २६) सकाळी महापूजा आणि अभिषेक झाल्यानंतर रंगमहालातील खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तींवर पुजारी सेवकवर्ग, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्या वतीने दुग्धाभिषेक घालून उत्सवमूर्ती वाजत-गाजत मुख्य मंदिरात नेऊन देवाचे विधिपूर्वक घट उठविण्यात आले. वांग्याचे भरीत, बाजरीचा रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सहा दिवसांच्या उपासनेची सांगता झाली. चंपाषष्ठीनिमित्त हजारो भाविकांनी जेजुरी गडावर कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले तसेच कुलधर्म, कुलाचारानुसार तळी-भंडार व जागरण गोंधळाचे विधी केले. या सहा दिवसांच्या उत्सवात खंडोबा मंदिर व जेजुरी गडाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.
या उत्सवानिमित्त जेजुरी देवसंस्थान व जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे दोन हजार किलो वांग्याचे भरीत, हजारो भाकरी तसेच पुरणपोळी व मिष्ठान्नाचा महाप्रसाद ५० हजारांहून अधिक भाविकांना देण्यात आला.
पहाटेपासून मानकरी, ग्रामस्थांच्या पूजा-अभिषेक जेजुरी गडावर सुरू होते. हजारो भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी केली होती. श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक आशिष बाठे, बाळासाहेब खोमणे, जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान व पुजारी सेवकवर्गाचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, अनिल आगलावे, अविनाश सातभाई, सतीश कदम, बाळकृष्ण दीडभाई, युवराज लांघी, संजय आगलावे, मल्हार बारभाई, सिद्धांत आगलावे, तन्मय आगलावे, वरद दीडभाई, ओंकार बारभाई, मुन्ना बारभाई, मिलिंद सातभाई आदींनी या उत्सवाचे नियोजन केले.