

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिन अहिर यांच्या कामाचा झपाटा, यामुळे शिवसेनेत उत्साह संचारला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने जागावाटपाची चर्चा रेंगाळत ठेवली. शिवसेनेला बेसावध ठेवले.
दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा केल्याने स्वतंत्र लढताना सेनेची दाणादाण उडाली.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिग्गजांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश याचा परिणाम म्हणून भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले शिवसेनेला अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
सध्या सर्वांनाच महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या कार्यपद्धतीविषयी सेनेचे नगरसेवक व पदाधिकार्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सेनेचे चार नगरसेवक भाजपच्या वाट्यावर होते.
याबाबतचे वृत्त पुढारीने प्रसिद्ध करताच सूत्रे हलली व जिल्हा संपर्क प्रमुखपदी माजी मंत्री सचिन अहिर तर सहसंपर्क प्रमुखपदी आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती झाली.
या पाठोपाठ पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुखपदी वैभव थोरात तर भोसरी संपर्क प्रमुख पदी केसरीनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सचिन अहिर यांनी पक्षबांधणीस वेग दिला आहे. विभाग प्रमुखापर्यंत पदाधिकारी नेमण्यात आले असून आता शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सदस्य नोंदणी चालू असून आढावा बैठका सुरू आहेत.
अहिर हे नगरसेवकांची विकास कामे, शिवसैनिकांनी घेतलेले कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत आहेत. नुकताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीत शहरवासीयांनी शिवसेनेला संधी दिली तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालतील.
मुंबईच्या धर्तीवर विकासाचे मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाईल असे आश्वासक विधान त्यांनी करून आयुक्तांची भेट त्यांनी घेतली. नगरविकास मंत्री पद शिवसेनेकडे असल्याने पालिकेशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडला पायधूळ झाडली. मनपा निवडणुकीत शिवसेना आघाडीसाठी सकारात्मक आहे. ते दोन पावले पुढे येत असतील तर आपण दोन पावले पुढे येऊ.
काँग्रेसला स्वतंत्र लढायचे असेल तर लढू द्या. मात्र, शिवसेनेबरोबर जमवून घेण्याची मानसिकता तयार करा, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना केले.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक असल्याचे चित्र समोर आल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे जागा मागताना झेपतील अन् जिंकून आणता येतील एवढ्याच जागा सेनेने मागाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
https://youtu.be/6Od5mMZ4sb8