

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा
मोसे, आंबी व मुठा या नद्या उगमापासून पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झाल्या. या तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अलीकडे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, ओढे-नाले बुजविले आहेत.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी खडकवासला जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली. अतिक्रमणांची पाहणी देखील केली. धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाहेरील पाटबंधारे विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला. वेळोवेळी मागणी केली. मात्र भूमी अभिलेख विभागाने वर्षभरापासून कोणत्याही ठिकाणी मोजणी केली नाही. ही मोजणी झाल्यास धरणक्षेत्रातील जमिनींवर किती अतिक्रमणे आहेत याची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत 1879 मध्ये खडकवासला धरण बांधण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1957 मध्ये पानशेत व 1977 मध्ये वरसगाव धरण बांधण्यात आले. धरण क्षेत्रातील पाटबंधारे खात्याच्या जमिनींची मोजणी ब्रिटिश राजवटीनंतर प्रथमच करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात पाटबंधारे विभागाची जवळपास पाचशे एकरांहून अधिक जमीन आहे. तसेच तीरालगत जलसंपदा विभागाच्या बहुतांश जमिनीवर, ओढे-नाल्यांवर खासगी कंपन्यांसह फार्म हाऊस, हॉटेल, मॉल्सची अतिक्रमणे आहेत. याबाबत विचारणा केली असता बांधकाम केलेल्या जमिनीचा सातबारा असल्याचे सांगितले जाते. जलसंपदा विभागाच्या पाहणीत पूररेषा, पाणलोट क्षेत्रात अतिक्रमणे, बांधकाम झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित जमिनीचा सातबारा मालकीचा असल्याचे दाखवून अतिक्रमण करणारे आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याबाहेरील तसेच संपादित जमिनीच्या मोजणीचा प्रस्ताव रीतसर पुणे भूमी अभिलेख विभागाला दिला आहे. प्रत्यक्ष जमीन मोजणी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. मोजणीचे पैसेही भरण्यात येतील; मात्र अद्याप मोजणी केली नाही. जमिनीच्या मोजणीमुळे तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंपदा विभागाची नेमकी कोठे व किती जमीन आहे याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार यांनी दिली.
वेल्हे तालुक्यातील ओढे, नाले तसेच नदीपात्रात अतिक्रमणे केल्याच्या कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
– शिवाजी शिंदे, तहसीलदार, वेल्हे
https://youtu.be/wimwsVNgHnY