

पुणे : काही युवती अनारकली विथ मोती वर्क असलेले कपडे डिझाइन करून घेत आहेत, तर काही जणींचा कल रेडी टू वेअर नऊवारी साडीकडे आहे. दिवाळीनिमित्त यंदा बाजारपेठांमध्ये जाऊन रेडीमेड कपडे खरेदी करण्यापेक्षा स्वत:ला आवडणाऱ्या डिझाइनमध्ये कपडे तयार करून घेण्यावर महिला-युवतींचा कल असून, त्यामुळेच फॅशन डिझायनरकडून कपडे डिझाइन करून घेण्याचा ट्रेंड यंदा वाढला आहे.(Latest Pune News)
खासकरून इंडो-वेस्टर्न कपडे डिझाइन करून घेण्याला महिला-युवती प्राधान्य देत आहेत. अनारकली विथ प्लाझो, एम्बॉयडरी केलेला कुर्ता विथ बनारसी ओढणी, अनारकली विथ हेवी लटकन, कुर्ता विथ प्लाझो अशा प्रकारचे कपडे डिझाइन करून घेतले जात असून, रेडीमेड कपड्यांच्या जमान्यात आता फॅशन डिझायनरने डिझाइन केलेल्या कपड्यांना मागणी वाढली आहे.
दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. यावर्षी रेडीमेड कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहेच; पण यंदा डिझायनर कपड्यांचीही चलती आहे. महिला-युवती फॅशन डिझायनरकडून कपडे डिझाइन करून घेत आहेत, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून फॅशन डिझायनर तयारीला लागले आहेत. स्वत:च्या आवडीप्रमाणे हवे तसे कपडे फॅशन डिझायनर तयार करून देत असल्याने डिझायनर कपड्यांना अधिक पसंती मिळत आहे. फॅशन डिझायनरकडून कपडे तयार करून घेण्याऱ्यांमध्ये युवतींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी युवती 3 हजार ते 15 हजार रुपयांपर्यत खर्च करीत आहेत.
दिवाळीचा आउटफिट जरासा हटके आणि स्टायलिश असावा, यासाठी फॅशन डिझायनरकडून कपडे तयार करून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. पारंपारिक लुकला पाश्चिमात्य टच मिळावा, याकडे त्यांचा कल आहे. म्हणूनच, घागरा असो वा साडी प्रत्येकात इंडो-वेस्टर्न स्टाईल असण्याकडे त्या लक्ष देत आहेत. त्यानुसारच डिझायनर त्यांचे कपडे डिझाइन करीत आहेत. खणाची साडी, घागरा साडी, रेडी टू वेअर नऊवारी आणि विविध प्रकारच्या साड्या डिझाइन करून घेतल्या जात आहेत. इंडो-वेस्टर्न प्रकारामध्ये घागऱ्याच्या अनेक डिझाइनबरोबर घागरा-क्रॉप-टॉप, स्कर्ट प्लाझो-क्रॉप टॉप, शरारा, स्कर्ट-कुर्तीज, प्लाझो- कुर्तीज, लेहंगा असे कपडे डिझाइन करून देण्यात येत आहेत. ब्लाऊजचे हटके डिझायनर साड्या, अनारकली, स्टायलिश पंजाबी ड्रेसालाही पसंती मिळत आहे.
फॅशन डिझायनर अस्मिता भोर-आहेर म्हणाल्या, मी इंडो-वेस्टर्न प्रकारातील कपडे डिझाइन करीत आहे. हव्या त्या डिझाइन आणि वर्कमध्ये हे कपडे डिझाइन करीत आहोत. तरुणी स्वत: आपल्या कपड्यांकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिकतेच्या जोडीला पाश्चिमात्य लूक मिळावा, यावर भर देत आहेत. डिझायनर आउटफिट घालण्याकडे कल वाढला आहे. तीन ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कपडे शिवून देत आहोत.