

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करून कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 20-30 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मनसेचे युवक सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी ’ॲक्शनवर ’रिॲक्शन’ होणारच,’ असा इशारा दिला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे यांच्या फिर्यादीनुसार मनविसेचे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह 20 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Latest Pune News)
फिर्यादीनुसार, मनविसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी (13 ऑक्टोबर) दुपारी कार्यालयात शिरले. तेथील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तोडफोड करून कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले. परिमंडल-1 चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले, विश्रामबागच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. 14) सकाळी मनसेचे युवक सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची भेट घेतल्यानंतर अभाविपला इशारा दिला.
ठाकरे म्हणाले, ‘ॲक्शनवर रिॲक्शन होणारच. हा प्रकार दुसऱ्यांदा झाला आहे. सत्तेत असल्याने कितीही प्रेशर टाका, तरीही काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत उभा आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची माझी इच्छा नाही. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आमच्याविरोधात लावलेल्या पोस्टरबाबत पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्ही तपासला जाईल. जर त्यात त्यांची मुले आढळली, तर त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील,’ असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
पुण्यातील परिस्थितीबाबत ठाकरे म्हणाले, पुण्याची परिस्थिती गंभीर आहे. ड्रग, महिलांवर अत्याचार, अल्पवयीन मुलांचा मद्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा, हे प्रकार वाढीस लागत आहेत. पोर्शे अपघातानंतरही काही झाले नाही. अठरा वर्षांखालील मुलांना दारू देणे ही भयंकर गोष्ट आहे, अशा अनेक घटनांच्या आम्ही आता नोंदी ठेवतोय.