Eid-e-Milad News : ईद-ए-मिलाद आज होणार साजरी

Eid-e-Milad News : ईद-ए-मिलाद आज होणार साजरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद – ए-मिलाद गुरुवारी साजरी होणार आहे. यानिमित्ताने मुस्लिम समाजबांधवांकडून खास तयारी करण्यात आली असून, मशिदींमध्ये मुस्लिम समाजबांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करणार आहेत. तसेच, काही संघटनांनी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि यानिमित्ताने घराघरांमध्ये खास खाद्यपदार्थही बनविले जाणार आहेत.

ईद – ए- मिलाद मुस्लिम बांधव उत्साहात साजरी करणार आहेत. विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण होणार आहे. यंदा गुरुवारी अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन मिरवणूक) आहे. त्याच दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद – ए- मिलाद आहे. गणेश विसर्जन आणि ईद – ए- मिलादच्या मिरवणुकीचे मार्ग एकच असल्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारची ईदची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी काढण्याचा निर्णय सिरत कमिटीने घेतला आहे. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख यांनी निवेदनाद्वारे दिली.

शेख म्हणाले, गणेश विसर्जन आणि ईद – ए- मिलादच्या मिरवणुकीचे मार्ग एकच असल्यामुळे सध्या परिस्थिती लक्षात घेऊन विशेष बैठक 27 ऑगस्टला बोलावण्यात आली होती. त्यात ईद – ए- मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे ढकलावी, असा निर्णय एकमताने करण्यात आला.

कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान कादरी तसेच उपाध्यक्ष मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन यांनी हा निर्णय घोषित केला. गुरुवारी ईदच्या निमित्ताने मिरवणूक नसली, तरी सामूहिक नमाज पठण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ईदच्या दिवशी काही सामाजिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. सिरत कमिटीतर्फे सकाळी नऊ वाजता बंडगार्डन येथील मुलींच्या आणि मुलांच्या अनाथाश्रमात नझीरभाई तांबोळी धायरीवाले यांच्या हस्ते मिठाई आणि फळवाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news