

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित आणि पाच विशेष अशा एकूण आठ फेर्या पूर्ण झाल्या आहेत. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्यात जमा आहे. तरीदेखील जे विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सन 2023-24 मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. तरीदेखील जे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. त्यांना 16 ते 24 सप्टेंबरदरम्यान प्रवेशाच्या पोर्टलवर अर्ज भाग एक व भाग दोन भरण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर 25 सप्टेंबरला भरलेल्या अर्जांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची यादी 26 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. तर 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.
यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 327 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 17 हजार 30 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 2 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीभूत प्रवेशांसाठी 1 लाख 1 हजार 65 जागा, तर कोट्याअंतर्गत प्रवेशांसाठी 15 हजार 965 जागा अशा एकूण 1 लाख 17 हजार 30 जागांमधून 77 हजार 175 जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तर प्रवेशासाठी 39 हजार 855 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा