Kolhapur Ganeshotsav : शहरात देखावे पाहण्यासाठी जनसागर लोटला | पुढारी

Kolhapur Ganeshotsav : शहरात देखावे पाहण्यासाठी जनसागर लोटला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  मंगळवारप्रमाणेच बुधवारीही दुपारनंतर मोठा पाऊस झाला. मात्र, पावसाच्या उघडिपीनंतर लोक देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. पावसाच्या तयारीनेच सहकुटुंब, मित्र-मंडळींसह दुचाकी-चारचाकी वाहनांवरून लोकांनी शहरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी कायम होती.

सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांसह बहुतांशी चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत होती. शिवाय मोठ्या पावसामुळे काही ठिकाणी वाहूतक सिग्नल बिघडल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला होता.

पावसाच्या तयारीने लोक घराबाहेर

दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत मोठा पाऊस झाल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यांचा शेवटचा दिवस असल्याने मंगळवारप्रमाणेच देखावे आणि गणेश दर्शनाकरिता जाता येणार नसल्याची भीती विशेषत: बालचमूंमध्ये निर्माण झाली होती. मात्र, पाऊस थांबल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. सहकुटुंब, मित्र परिवारासह आबालवृद्ध, महिला रेनकोट, छत्र्यांसह पावसाच्या तयारीनेच घराबाहेर पडले. शहरासह उपनगरे व ग्रामीण भागातूनही लोक दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच पायी देखावे पाहण्यासाठी शहरात दाखल झाले होते.

पेठांसह उपनगरांतही वाहनांच्या रांगा

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर व रंकाळा स्टँड परिसर, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठेसह लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बिंदू चौक परिसर, राजारामपुरी, छत्रपती संभाजीनगर परिसरातील देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून लोक एकवटले होते. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते व चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकेका चौकात चार-चार वाहतूक पोलिस, सहायक पोलिस व होमगार्ड यंत्रणा वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सक्रिय होते.

खाऊगल्ल्या-हॉटेल्स हाऊसफुल्ल

पाऊस थांबल्या-थांबल्या सायंकाळी 7 च्या सुमारास लोक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडल्याने. बहुतांशी लोकांनी बाहेरच नाष्ता, जेवणाचा बेत आखला होता. यामुळे शहरातील सर्व खाऊगल्ल्या, हॉटेल्स, चहा व खाद्य पदार्थांच्या टपर्‍या हाऊसफुल्ल होत्या. लहान मुलांची खेळणी, मनोरंजनासाठी झोपाळे, गृहपयोगी साहित्य, महिला-मुलींकरिता आवश्यक वस्तूंची विक्री करणारे विक्रेते ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बसल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महाप्रसाद, चहा, पाणी वाटप

देखाव्यांचा शेवटचा दिवस असल्याने अनेक मंडळांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. मसाले भात, गोड कळ्या, शिरा यासह चहा-पाणी यांचेही वाटप केले जात होते. देखावे पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी आवर्जून या गोष्टींचा लाभ घेतला. रात्री 12 नंतर अनेक मंडळांंनी विसर्जन मिरवणुकीच्या तयारीस सुरुवात केली.

Back to top button