थंडी घटली, उन्हाचे दिवस वाढले; हरित वायू उत्सर्जनाचा परिणाम

थंडी घटली, उन्हाचे दिवस वाढले; हरित वायू उत्सर्जनाचा परिणाम
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हरित वायू उत्सर्जनामुळे जगाच्या हवामानावर विपरीत परिणाम होत असून, गेल्या 50 वर्षांत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण 60 टक्क्यांनी वाढल्याने वातावरणातील थंडीत घट, तर उष्णतेच्या लाटांत वाढ होत आहे. त्यासाठी हरित वायू उत्सर्जन कमी करणे हाच यावर उपाय असल्याचे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केले.

डॉ. महापात्रा यांचे शुक्रवारी शहरातील आयसर (राष्ट्रीय विज्ञान संस्था) येथे 'बदलते हवामान आणि आपली जबाबदारी' या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी आयसरमधील संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या वेळी हवामान विभाग व आयसर यांच्यात हवमानातील संशोधनाबाबत सामंजस्य करार झाला. महापात्रा यांनी त्यांचे व्याख्यान पॉवर पॉइंट प्रेझेंटेश व्दारे दिले. त्यांनी भारतासह संपूर्ण जगातील हवामान कसे लहरी होत आहे? त्याची नेमकी कारणे काय? याबाबत शास्त्रीय माहिती दिली. या वेळी पुणे वेधशाळेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर उपस्थित होते.

उष्णतेच्या लाटा वाढल्या

महापात्रा म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत भारताच्याच नव्हे, तर जगाच्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. कार्बनडायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, मिथेन, क्लोरो-फ्लुरो कार्बन, बाष्प, ओझोन या घटकांचे (हरित वायू) उत्सर्जन भारतातच नव्हे, तर जगात वाढल्याने त्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. पाऊस लहरी बनला आहे. त्यामुळे कमी दिवसांत जास्त पाऊस, कुठे पूर, तर कुठे दुष्काळ, अशी परिस्थिती वाढली. सातत्याने पडणारा पाऊस कमी झाला तसेच थंडीचे दिवस कमी होऊन आता उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली आहे.

समुद्राची उष्णता वाढतेय

2022 हे आजवरचे 5 वे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे नासा संस्थेने त्यांच्या अहवालात नमूद केले. हिमशिखरांची उंची कमी होणे, वसंत ऋतू लवकर येणे हे बदल आपण पाहत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची उष्णता 90 टक्क्यांनी वाढत आहे.समुद्राची अ‍ॅसिडिटी वाढत आहे. त्यामुळेच पाऊसमान कमी होऊन दुष्काळाचे प्रमाण जगभरात वाढत असल्याचे महापात्रा यांनी सांगितले.

पिकांवर होतोय विपरीत परिणाम

महापात्रा यांनी सांगितले की, या वातावरणाचा मासेमारीवर सर्वांत मोठा प्रभाव होत आहे. समुद्रातील हवामान प्रदूषित होत असल्याने माशांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच गहू, तांदूळ या पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मान्सूनचा पाऊस
घटत असल्याने दरडोई उत्पन्नात 3 ते 5 टक्क्यांनी घट झाली आहे.

'हर घर हवामान'ची गरज

आगामी काळात सर्वांना हवामान हा विषय समजून घ्यावा लागणार आहे. खासकरून शेतकरीवर्गाला ते रोजच पाहावे लागणार
आहे. त्यासाठी हवामान विभागाने 2027 पर्यंत 'हर घर हवामान' हे मिशन हाती घेतले आहे. घरातील प्रत्येकाने हवामानाचे अपडेट माहीत करून घेणे आता गरजेचे आहे. हवामान हे तुमच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. त्यामुळे ही माहिती सतत ठेवणे गरजेचे
झाले आहे, असेही महापात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news