पुणे विमानतळावरील जुन्या कार्गो टर्मिनलचे स्थलांतर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेल्या नव्या कार्गो टर्मिनलमध्ये आजपासून (दि. 05) जुने टर्मिनल स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकर व्यापार्यांना दिलासा मिळणार असून, मालवाहतुकीच्या आयात-निर्यातीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तयार होऊन सज्ज असलेले नवीन कार्गो टर्मिनल अद्यापपर्यंत खुले करण्यात आले नव्हते. यासंदर्भात दै.’पुढारी’कडून वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विमानतळ प्रशासनाने दखल घेत, ते आजपासून सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करणार असल्याचे सांगितले. हे नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यावर पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये दुप्पट वाढ होणार आहे.
वायुदलाची 1.76 एकर जमीन
भारतीय हवाई दलाने पुणे विमानतळ प्रशासनाला या कार्गो टर्मिनल उभारण्यासाठी मोठी मदत केली आहे. येथीलच 1.76 एकर जागा हवाई दलाने विमानतळ प्रशासनाला कार्गो टर्मिनलसाठी दिली. त्याच जागेवर आता हे कार्गो टर्मिनल उभारण्यात आले आहे.
जुने कार्गो टर्मिनलचे शिफ्टिंग उद्यापासून नवीन कार्गो टर्मिनलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे.– संतोष ढोके, संचालक,पुणे विमानतळ
हेही वाचा