शिक्षण विभागाची ‘वॉररूम’ पुण्यात; एका क्लिकवर विविध योजनांची माहिती

शिक्षण विभागाची ‘वॉररूम’ पुण्यात; एका क्लिकवर विविध योजनांची माहिती
Published on
Updated on

पुणे : राज्यातील शिक्षणाशी संबंधित विविध योजनांची माहिती एका क्लिकद्वारे मिळवून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हायटेक वॉररूम तयार करण्यात आली आहे. या वॉररूमला विद्या समिक्षा केंद्र अर्थात व्हीएसके नाव असून या वॉररूमच्या माध्यमातून ऑनलाईन हजेरी, विद्यार्थ्यांचे निकाल, विद्यार्थी लाभांच्या योजनांची सद्य:स्थिती कळणार आहे. येत्या फेब—ुवारी महिन्यात संबंधित वॉररूमचे उद्घाटन होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उपसंचालक कार्यालयाच्या आवारात व्हीएसके तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून शिक्षण विभागातील माहिती एकत्रित करून निर्णय गतिमान स्वरूपात घेता येणार आहेत. सध्या राज्यातील विद्यार्थ्यांची दैंनदिन ऑनलाईन हजेरी, विद्यार्थ्यांचे निकाल, शालेय पोषण आहाराची दैनंदिन स्थिती, विविध शिष्यवृत्तीसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पायाभूत सुविधा, प्रशासकीय माहिती एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर या माहितीची योग्य वर्गवारी करून सरकारी पातळीवर आवश्यक कार्यवाही केली जाणार असून संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवली जाणार आहे. यासाठी माहितीची एक बँक तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी सर्वांगिण विकासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी संपादणुक व अध्ययन निष्पत्ती या राष्ट्रीय स्तरावरून तपासल्या जाणार्‍या आहेत. त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र अर्थात परख स्थापन केले आहे. या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राला विविध प्रकारची माहिती देण्याचे कार्य व्हीएसकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षण क्षेत्रात प्रचंड पारदर्शकता येणार असून बोगस पटसंख्या, शालेय पोषण आहारातील अपहार याला कायमचा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचा हातभार

शाळा व शाळेच्या सर्व भागधारकांचा विद्या समिक्षा केंद्राच्या उपक्रमात सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी केंद्र आणि जिल्हास्तरावरील अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन करत आहे. तसेच येत्या काळात शिक्षक व जिल्हास्तरावरील यंत्रणांना येणार्‍या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी व्हीएसके केंद्रात हेल्पडेस्क तयार करण्यात येणार आहे.

विद्या समिक्षा केंद्राच्या माध्यमातून काय होणार साध्य

  •  विविध योजनांवर रिअल टाईम नियंत्रण ठेवता येणार
  •  माहितीवर आधारितच निर्णय घेतले जाणार
  •  लाभाच्या योजना, उपक्रमांवर लक्ष ठेवणार
  •  शिक्षकांसाठी मदत, प्रोत्साहन व पुरस्कार देणार
  •  तातडीने मदत करण्यासाठी आवश्यक गरजा क्षेत्र निश्चित करता येणार
  •  हेल्पडेस्कच्या माध्यमातून अडचणी सोडवणार
  •  शाळा मानांकनाचे कार्य होणार
  •  शाळांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता तपासणार
  •  शिक्षण विभागाच्या प्रगतीचा महिन्याला आढावा घेणार

राज्यातील विविध प्रकारची माहिती गोळा करून त्यावर कार्य करण्यासाठी विद्या समिक्षा केंद्र तयार करण्यात आले आहे. यामधून प्रत्येक बालकाच्या शिकण्याच्या गतीचा मागोवा घेतला जाणार आहे. भविष्यात शिक्षक हजेरी, ऑनलाईन शाळा भेट, शासकीय अनुदान व इतर निर्णय विद्या समिक्षा केंद्राच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत.

– आसिफ शेख, समन्वयक, विद्या समिक्षा केंद्र

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news