Pune vegetable News : पितृपक्षामुळे पालेभाज्या कडाडल्या

Pune vegetable News : पितृपक्षामुळे पालेभाज्या कडाडल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पितृपक्षास सुरुवात होताच नैवैद्यासाठी लागणार्‍या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी या फळभाज्यांसह मेथी व अळूच्या पानांच्या खरेदीसाठी गृहिणींची पावले बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने त्यांच्या भावातही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती विक्रेते चरण वणवे यांनी दिली. गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला प्रारंभ झाला आहे. या कालावधीत मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षात श्राद्ध करण्यास मोठे महत्त्व असते. त्यामुळे या दिवसांत घरोघरी तिथीनुसार श्राद्ध होते.

श्राद्धाच्या दिवशी पंचपक्वान्नाचे भोजन केले जाते. याकाळात लागणार्‍या कारली, गवार, चवळई, भेंडी, तांबडा भोपळा, देठ तसेच मेथीला मोठी मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा भागातून फळभाज्या तसेच पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, मागील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम या भाज्यांच्या दर्जासह आवकेवरही झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात दररोज सर्व प्रकारचा मिळून सरासरी 60 ते 70 ट्रक शेतमाल दाखल होत आहे. पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात भेंडी आठ ते दहा टेम्पो, कारली सात ते आठ टेम्पो, गवार सात ते आठ टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो असा शेतमाल दाखल होत आहे. याखेरीज, मेथीच्या पन्नास ते साठ हजार व कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची आवक होत आहे.

पितृपक्षात नैवेद्यासाठी अनेक पदार्थ करण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक स्वतंत्र भाजी बनविण्यात येते. पितृपक्षाला प्रारंभ झाल्यापासून बाजारपेठ गजबजली असून, फळभाज्या व पालेभाज्यांखेरीज पूजेसाठी लागणारी विड्याची पाने, सुपारी, केळीची पाने, पत्रावळी, द्रोण, गुलाल, कापूर, कुंकू, हळद, माळा, तांदूळ यांसारख्या अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी होताना दिसून येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news