Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कसाठी ठाकरे गटाची पालिकेला दोन दिवसांची मुदत | पुढारी

Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कसाठी ठाकरे गटाची पालिकेला दोन दिवसांची मुदत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क ) येथे दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मैदानासाठी केलेल्या अर्जावर दोन दिवसांमध्ये निर्णय घ्या, असा इशारा ठाकरे गटाकडून पालिकेच्या दादर जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आला आहे. यावर पालिकेने विधी खात्याचा कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. (Dasara Melava 2023)

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटासह शिंदे गटानेही अर्ज केला आहे. अर्ज करून तब्बल महिला लोटला तरी पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दादर- माहीममधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दादर जी- उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी अर्जाबाबत निर्णय का घेतला जात नाही, असा जाब विचारण्यात आला. एवढेच नाही तर शिवाजी पार्कवरच ठाकरे गटाचा मेळावा ६ होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पालिकेच्या विधी विभागाचा कायदेशीर सल्ला घेऊन ठाकरे व शिंदे गटाकडून आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले. (Dasara Melava 2023)

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा होतो. शिवसेना नाव व धनुष्यबाण निशाणी आमच्याकडे आहे त्यामुळे प्रथा परंपरेनुसार शिवसेनेला शिवाजी पार्क मिळायलाच हवे, अशी आग्रही भूमिका शिंदे गटाची आहे, तर शिवाजी पार्कवर प्रथा परंपरेनुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार, यावर ठाकरे गट कायम आहे. त्यामुळे आता पालिका काय निर्णय घेणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

यंदाही संघर्ष कोर्टात पोहोचण्याची शक्यता

 गेल्या वर्षी ठाकरे गटाचा पहिला अर्ज आला होता. मात्र राजकीय दबावामुळे पालिकेने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली. अखेर कोर्टाने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाला ठाकरे गटाला परवानगी द्यावी लागली होती. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला होता. (Dasara Melava 2023)

Back to top button