राष्ट्रीय मतदार दिवस : ऑनलाइन नोंदणीमुळे वाढले नवमतदार

New Voters file photo
New Voters file photo

नरेंद्र साठे

पुणे : टेक्नोसॅव्ही काळात सगळे काही ऑनलाइन उपलब्ध होतेय. निवडणूक विभागानेही या वर्षी मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा उपयोग केला. तरुणांच्या हातातील मोबाईलवरूनच सहज मतदार नोंदणी करणे शक्य झाले आणि पुणे शहरासह जिल्ह्यात दोनच महिन्यांत दोन लाख 62 हजार 645 मतदार वाढले.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मतदार नोंदणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. महाविद्यालये, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचा सहभाग आणि मतदारसंघनिहाय झालेल्या उपक्रमाचा फायदा झाल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. जिल्ह्यामधील 21 मतदारसंघांतील मतदारांची संख्या 81 लाख 58 हजार 539 झाली आहे.

जिल्हा निवडणूक शाखेने गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भाग मिळून एकूण 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांची संख्या 78 लाख 95 हजार 894 होती. अंतिम मतदार यादीत त्यामध्ये दोन लाख 62 हजार 645 मतदारांची भर पडली आहे. पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही महानगरपालिकांची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा होता. जिल्हा निवडणूक शाखेकडून महानगरपालिकांना मतदार जागृती मोहिमेत समाविष्ट करून घेतले. काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात याबाबत पुढाकारही घेतला. काही दिवसांत होणार्‍या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून शहरासह जिल्ह्याची प्रसिद्ध केलेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

कुठे किती मतदार?

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये 32 लाख 22 हजार 790, पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघांमध्ये 14 लाख 31 हजार 887, तर ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदार संघांमध्ये 35 लाख तीन हजार 862 मतदार झाले आहेत. शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वाधिक पाच लाख 55 हजार 910 मतदार हडपसरमध्ये असून खडकवासला मतदारसंघ दुसर्‍या क्रमांकावर आहे.

सर्वात कमी म्हणजेच दोन लाख 86 हजार 57 मतदार कसबा पेठ मतदारसंघात आहेत. जिल्ह्यातील एकूण 21 विधानसभा मतदारसंघांपैकी पिंपरी-चिंचवडमधील मतदारसंघांत पाच लाख 64 हजार 995, भोसरी मतदारसंघात चार लाख 98 हजार 090, तर पिंपरी मतदारसंघात तीन लाख 68 हजार 802 मतदार झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चार लाख 13 हजार 253 मतदार शिरूरमध्ये, तर सर्वात कमी दोन लाख 97 हजार 158 मतदार आंबेगाव तालुक्यात आहेत.

राष्ट्रीय मतदार दिन ऑनलाइन

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस ऑनलाइन साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस राज्य, जिल्हा तसेच मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी आयोगाकडून 'सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका' ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. मतदानाची शपथ ऑनलाइनच घ्यावी.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी विशेष दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष ग्रामसभा झाल्या. वंचित घटकांसाठी कार्यशाळा घेण्यास सांगितल्या होत्या. दोन्ही महापालिकांनादेखील जनजागृती करण्यास सांगितले होते. वोटर हेल्पलाईनवर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहनदेखील केले होते. त्याचा फायदा झाला.
– मृणालिनी सावंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news