वर्धा : ४० फुटांवरून कार कोसळली; मेडिकलच्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये भाजप आमदाराच्या पुत्राचा समावेश | पुढारी

वर्धा : ४० फुटांवरून कार कोसळली; मेडिकलच्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये भाजप आमदाराच्या पुत्राचा समावेश

वर्धा, पुढारी ऑनलाईन : चारचाकी वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये मेडिकल काॅलेजच्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. देवळीमधून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

मृतांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा समावेश आहे. काल रात्री ११.३० च्या सुमारास सेलसुराजवळील पुलावरून कार खाली पडली. यामुळे हा अपघात झाला. हे सर्वजण वर्ध्याला जात होते, अशी माहिती  वर्ध्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली आहे.

चालकाचे चारचाकीवरून नियंत्रण सुटल्याने सेलसुराजवळील नदीच्या पुलावरून चारचाकी खाली कोसळली आहे. सुमारे ४० फुटांवरून ही चारचाकी खाली पडल्यामुळे भीषण अपघात झाला. रात्री ११.३० वाजता हा अपघात झाला असून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे वय २५-३५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

पहाटे ४ वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल काॅलेजमधील होते.

वर्धा सामान्य रुग्णालयात मृत विद्यार्थ्यांचे शवविच्छेदनासाठी पाठल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची अजुनही ओळख पटू शकलेली नाही. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button