

कामशेत (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : कामशेत-पवनानगर रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे वाहनचालक व पादचार्यांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
अपूर्ण कामामुळे रस्त्यात साचले पाणी
कामशेत-पवनानगर रस्त्यावर एका बाजूला रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे व त्याच रस्त्याच्या अर्ध्या बाजूला काम अपूर्ण आहे. त्या अपूर्ण कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. कामशेत-पवनानगर रस्ता सतत वर्दळीचा असतो. या रस्त्यावरून दिवस रात्र वाहतूक सुरू असते. अनेक वाहनधारक छोटी मोठी वाहने घेऊन या रस्त्यावरून वाहतूक करत असतात. रस्ता अपूर्ण असल्यामुळे एकाच बाजूने वाहनांना ये जा करावी लागत आहे. त्यामुळे चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. दोन्ही बाजूने मोठ्या गाड्या आल्या तर वाहतूककोंडी होते आणि दुचाकीस्वारांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
याशिवाय पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याची शक्यता असते. परिणामी या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता आहे. संभाव्य अपघातास जबाबदार कोण? असा सवाल वाहनधारक व पादचार्यांकडून केला जात आहे.
चालकांना नाहक त्रास
दरम्यान, रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर हे काम रेंगाळले. काम अपूर्ण राहिल्याने चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील काही महिने वाहनचालकांना असाच प्रवास करावा लागणार आहे.
या रस्त्यावर आम्हाला सतत प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर विजेची सोय नसते. परिणामी प्रवास करताना अडचण होते. रस्ता अपूर्ण असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे.
– योगेश देसाई, वाहनचालक
हेही वाचा :