हिंगोली गोळीबार प्रकरण : पाच जणांवर गुन्हा दाखल, एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक, एक पिस्टल जप्त | पुढारी

हिंगोली गोळीबार प्रकरण : पाच जणांवर गुन्हा दाखल, एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक, एक पिस्टल जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाकडून पिस्टल जप्त करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी दुपारी गोळीबार झाला. या घटनेमुळे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कचवे, यांनी तातडीने विविध पथके स्थापन केली. यामध्ये पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना केली, तर घटनास्थळावर तीन पथके तैनात होती. या प्रकरणामध्ये आज पहाटे पोलिस उपनिरीक्षक सतीश ठेंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये अक्षय इंदोरिया, ओम पवार, सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यामध्ये तिघा जणांचा या गुन्ह्यामध्ये हात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये गोळीबार करणाऱ्या एका मुख्य आरोपीचा समावेश असून, त्याच्याकडून पिस्टलही जप्त करण्यात आले आहे. जुन्या वादातूनच हा प्रकार झाल्याचेही पोलिस चौकशीमध्ये पुढे आले आहे. या प्रकरणात उर्वरित संशयीतांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासांमध्ये संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सदर गोळीबाराच्या घटनेचा संपूर्ण छडा लागला आहे. जुन्या वादातून हा प्रकार झाला आहे. पप्पू चव्हाण यांची प्रकृती चांगली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button