डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदारांना समन्स

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदारांना समन्स

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बचाव पक्षातर्फे मंगळवारी (दि. 19) दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी सादर करण्यात आली. न्यायदंडाधिकारी पी. पी. जाधव यांनी संबंधित साक्षीदारांना समन्स बजावले असून, पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मागील सुनावणीदरम्यान सीबीआयने जे पुरावे सादर केले ते खोटे असल्याचे आरोपींनी न्यायालयात सांगितले होते.

त्या वेळी शरद कळसकर, संजीव पुनाळेकर यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. तर, डॉ. तावडे यांनी सीबीआयच्या अधिका-यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्याची मागणी केली होती. त्या वेळी न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचा आदेश बचाव पक्षाला दिला होता. त्यानुसार मंगळवारी (दि. 19) झालेल्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे दोन नावांचा समावेश असलेली यादी सादर केली गेली. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 20 साक्षीदार सादर केले असून, त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना 300 पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना माहीत नाही, अशी उत्तर दिली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news