बारामतीकरांच्या दुटप्पी राजकारणात दौंडची मजबूत राष्ट्रवादी होतेय खिळखिळी

ZP Election Logo
ZP Election Logo
Published on
Updated on

विजय चव्हाण

केडगाव : बारामतीच्या राजकीय खेळीत दौंडच्या राष्ट्रवादीत मजबुती असूनसुद्धा खिळखिळी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षाला मोठे करणारे नेते पवारांच्या आशीर्वादाने पक्षातील अंतर्गत दुफळीचे शिकार बनले आहेत आणि परिणामी राष्ट्रवादीला अंतर्गत ग्रहण लागले आहे. स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींत आमदारकीच्या तिकिटांचा, रमेश थोरात आणि कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांच्या उमेदवारीचा तो वादग्रस्त धुरळा बारामतीपासून राज्याच्या राजकारणात घुसला होता. तो थोडाफार शमला असला, तरी अजून छोट्या-मोठ्या घटनांतून तुरळक दिसत आहे.

Baramati-Daund
Baramati-Daund

दौंड तालुक्यात राष्ट्रवादीची त्या वेळी मजबूत पकड होती. मात्र, बारामतीच्या राजकारणाचा आशीर्वाद कुल आणि थोरात या दोघांनाही होता, असे चित्र बारामतीच्या राजकारणातून तालुक्यात दिसू लागले होते आणि त्याचा अभ्यास मतदार आणि राजकीय विश्लेषक करीत होते. एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, याप्रमाणे कुल-थोरात एकाच पक्षात राहून एकमेकांना पाण्यात पाहू लागले होते. हेच प्रकरण मजबूत राष्ट्रवादीच्या मुळावर उठले. तालुक्यात एकतर्फी असणारे राजकारण दुतर्फा होऊ लागले आणि अनेक वर्षे राजकारणात लक्षवेधी धडपड करणारा भाजप पक्ष आज दौंडची आमदारकी घेऊन राष्ट्रवादीला तगडे आव्हान उभे करीत आहे.

राहुल कुल शरद पवारांच्याच तालमीतले

आमदार राहुल कुल भाजपचे असले, तरी त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच झाला आहे. ते स्वर्गीय आमदार सुभाष कुल आणि माजी आमदार रंजना कुल यांचे चिरंजीव आहेत. ज्यांनी राजकीय बाळकडू शरद पवार यांच्याकडून घेतले, त्यांनी पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी आपली पत्नी कांचन यांना भाजपची उमेदवारी घेऊन राष्ट्रवादी आणि पवारांना तगडे आव्हान दिले होते. सुळे यांनी मागील काळात कुल-थोरात एका व्यासपीठावर असताना आणि शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंड शहरात म्हणाल्या की, मला आईने दिले काय आणि मावशीने दिले काय, फरक पडत नाही. या वाक्याचा अर्थबोध तालुक्यात मतदारांनी आपापल्या पद्धतीने सोईस्कर काढला होता.

एकाच म्यानात दोन तलवारी कशा सांभाळणार?

कुल आणि थोरात एकाच पक्षात राहून कट्टर विरोधक असल्याने त्याचा अर्थ सर्वत्र चर्चेतून वादळासारखा फिरला होता. कोण मावशी आणि कोण आई, हे मात्र सुळे यांना पक्के माहीत होते. असे असताना सुळे आणि पवार हे पक्षासाठी आई-मावशी एकत्रित ठेवण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याचे सोडून एकाला सकाळी आणि दुसर्‍याला दुपारी बोलावून वेगवेगळे हाताळत होते. हा परिणाम हळूहळू कुल आणि थोरात या दोघांनाही त्रासदायक झालेला असल्याने थोरात हे काही काळ पक्षाला रामराम करीत काँग्रेसच्या थव्यात सामील झाले होते. त्यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी हाताला धरून परत घरवापससी केलेली सर्वांना माहीत आहे. पक्ष धोरण तरीही बदल होत नसल्याने आणि थोरात परत पक्षात आल्याने कुल नाराज झाले. त्यांनी अचानक पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेचे तिकीट घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला.

बारामतीच्या डावपेचांवर मतदारांनी केला राग व्यक्त

पक्षाचा प्रभाव असताना दौंड तालुक्यातील मतदारांनी पवारांच्या तालुक्यातील राजकीय खेळीविरोधात राग व्यक्त केला होता. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या मजबुतीपुढे भाजप आणि अन्य पक्ष कधीच म्हणावे एवढे चमकले नाहीत. ते चमकले ते पवारांच्या राजकीय डावपेचांमुळे, हे नाकारून चालणार नाही. दौंड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे राष्ट्रवादी मजबुतीने सत्ता भोगत आहे. नगरपालिका बहुमताच्या उंबरठ्यावर विसावली आहे. तरीही पक्षाची अंतर्गत बंडाळी थांबलेली नाही. याची महत्त्वाची करणे पवार धोरणी राजकारण आहे, असे ठाम मत दौंड तालुक्यातील जनता व्यक्त करीत आहे.

गटबाजीचा खेळ सुरूच

येत्या काही काळात नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत. पक्षात सुळे यांचा एक गट आणि अजित पवार यांचा एक गट, अशी धारणा मतदारांना काही नेत्यांच्या वर्तनाने दिसत असल्याने ते बोलून दाखवत आहेत. या सर्व प्रकाराला पवारांशिवाय कोणालाही आळा घालता येणार नाही आणि ते करणे काळाची गरज आहे; अन्यथा आगामी काळात दौंड तालुक्यातील अंतर्गत पक्षीय राजकारण पवार आशीर्वादाने जोरावते आहे, असा समज मतदार पक्का करून घेतल्याशिवाय राहणार नसून, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीचे निकाल दाखवतील, यात शंका नाही आणि भक्कम पक्ष खिळखिळा झाला कसा, याचे चिंतन करूनही फायदा होणार नाही, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news