

पुणे : रिंगरोडची आत नवीन ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी आठ हजारांहून अधिक झाडांचे पुनर्रोपण, पाच लाखांहून अधिक नवीन वृक्ष लागवड, टोल नाका, टनेल आणि रस्त्यावरील दिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर, अशा विविध माध्यमांतून ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून उदयास येणार आहे.(Latest Pune News)
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. पूर्व व पश्चिम दोन टप्प्यांत असलेल्या या रिंगरोडची एकूण लांबी 136 किलोमीटर असून, त्यांची रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. या रिंगरोडसाठीचे भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात झाली आहे. 2028 पर्यंत रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने ठेवले आहे.
हा रिंगरोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखला जावा, यासाठी विविध उपयोजना करण्यासाठी महामंडळाकडून निविदा मागवून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासनाने एमएसआरडीसीच्या माध्यमातून यापूर्वी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा महामार्ग उभारल्यानंतर त्यावरील टोल नाक्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते. त्यांचे प्रतिमहिना जवळपास 60 लाख रुपये वीजबिल महामंडळास भरावे लागते. वीजबिल कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गावर एक पाच, तर दुसरा चार किलो मॅगावेट क्षमतेची सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
त्या माध्यमातून वीजबिल कमी करण्याचा प्रयत्न झाला. महामार्गाची उभारणी झाल्यानंतर हे काम करण्यात आले. तेथील अनुभव लक्षात घेऊन रिंगरोडची उभारणी करताना त्यांचे नियोजन करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार रिंगरोडवरील टोल नाके तसेच टनेल (बोगदे) आणि पथदिवे यांच्यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणला देऊन वीजबिलात बचत केली जाणार आहे.
रिंगरोड ‘ग्रीन कॉरिडॉर’ ओळखला जावा, यासाठी सौरऊर्जेचा वापर, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नव्याने पाच लाख झाडे लावणे, अशी कामे करण्याचे नियोजन आहे.
राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी
रिंगरोडच्या कामामध्ये सुमारे आठ हजारांहून अधिक वृक्षतोड करावी लागणार आहे. त्या सर्व वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आत्तापर्यंत सुमारे साडेतीन हजार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. रिंगरोडच्या कडेने नव्याने पाच लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.