Diwali Special : आरोग्य दीप लावूया दारी..!

Diwali Special : आरोग्य दीप लावूया दारी..!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व. उत्सव प्रकाशाचा आणि तोंड गोड करण्याचा. तरीही वाढते प्रदूषण, त्यातून होणारे श्वसनविकार यांचा विचार करून या दिवाळीत सगळे जण आरोग्यदीप दारी लावूया, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी केले आहे. खमंग फराळ, स्वादिष्ट मिठाई, चॉकलेट, मिष्टान्न यावर ताव मारण्याची सुवर्णसंधी म्हणजे दिवाळी. ही दिवाळी गोड व्हावी, यासाठी नातेवाईक, मित्रपरिवाराला आवर्जून मिठाई दिली जाते. मात्र, 'गोड' दिवाळी 'कडू' होऊ नये, यासाठी मिठाई खरेदी करताना त्याचा दर्जा तपासून घ्या, त्याची मुदत तपासून घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला मिळते. आकर्षकरीतीने सजविलेले पदार्थ आपल्याला आकृष्ट करीत असतात. एरवी, स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयरोग अशा विविध समस्यांमुळे पाळावे लागणारे 'डाएट' नावाचे भूत सणासुदीला मानगुटीवरून उतरविले जाते. मात्र, जिभेचे तात्पुरते चोचले पुरविण्यासाठी गोड पदार्थांवर मारलेला ताव आरोग्याची चिंता आणखी वाढविणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

फराळावर ताव मारताना नियमित व्यायामावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले आहे. जनरल फिजिशियन डॉ. रेवती लिमये म्हणाल्या, 'काही घरांमध्ये ऑर्डर देऊन बाहेरून बनवून घेतले जातात. फराळाचे तयार पदार्थ विकत घेताना वापरले जाणारे तेल, इतर घटक चांगल्या दर्जाचे वापरले आहेत का? याची खात्री करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते. निकृष्ट घटक वापरले गेले असल्यास घसा बसणे, खोकला होणे, पित्त वाढणे, अपचन होणे, विषबाधा असे प्रकार होऊ शकतात.'

काय काळजी घ्यावी?

  • मिठाई नोंदणीकृत खाद्य विक्रेत्याकडून खरेदी करावी.
  • मिठाईच्या बॉक्सवर किंवा पॅकिंगवर एक्स्पायरी डेट लिहिली आहे की नाही, हे तपासून पाहावे.
  • मिठाई ताजी आहे का? याची स्वत: थोडी चव आणि वास घेऊन खात्री करून घ्यावी.
  • मिठाईच्या दुकानामधील स्वच्छता, कामगारांची स्वच्छता, आरोग्याबाबत आवर्जून माहिती घ्यावी.
  • मिठाईच्या, विशेषत: दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाबाबत बॉक्सवर लिहिलेले नियम पाळावेत.

मधुमेही व्यक्तींनी उपाशीपोटी मिठाईचे सेवन करू नये. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. आजकाल बाजारात शुगर फ्रि मिठाई मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नामांकित आणि विश्वासार्ह ब—ँडची मिठाई खरेदी करावी. कोणत्याही पदार्थांच्या सेवनाचा अतिरेक टाळावा. दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळाचे पदार्थही खाल्ले जात असल्याने जेवणात शक्यतो हलका आहार किंवा फलाहार घ्यावा.

– पौर्णिमा शिंदे, आहारतज्ज्ञ

चिवडा, लाडू, चकल्या, करंज्या अशा पदार्थांची सध्या घराघरांत रेलचेल पाहायला मिळत आहे. दिवाळीचा आनंद फराळाशिवाय लुटणे शक्य नाही. मात्र, यातही आरोग्यदायी फराळाचा पर्याय निवडता येऊ शकतो. मैद्याचा कमीत कमी वापर करून तांदूळ, नाचणी, गहू, मूग यांचा वापर करूनही चविष्ट फराळ बनवता येतो. मी गेल्या चार वर्षांपासून आरोग्यदायी फराळ बनवत आहे. फराळाच्या गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा, खजुराचा वापर करता येऊ शकतो. पदार्थ तळण्याऐवजी एअर फ—ाय करता येऊ शकतात.

– अलका जोशी, गृहिणी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news