घरी महिला जास्त वेळा जेवण बनवतात की पुरुष? | पुढारी

घरी महिला जास्त वेळा जेवण बनवतात की पुरुष?

वॉशिंग्टन : भारत असो किंवा अन्य कोणताही देश असो, घरोघरी सर्वांना जेवण बनवून खाऊ घालणार्‍या अन्नपूर्णा पाहायला मिळतात. अर्थात अनेक पुरुषांनाही वेगवेगळे चवीचे पदार्थ बनवण्याची हौस असते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात तर ही संख्या आणखीनच वाढली होती. आता घरात स्त्री अधिकवेळा जेवण बनवते की पुरुष याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये महिलाच पुरुषांच्या तुलनेत अधिकवेळा जेवण बनवतात, असे दिसून आले.

2022 मध्ये महिलांनी दर आठवड्याला सरासरी नऊवेळा जेवण बनवले तर पुरुषांनी सुमारे चारवेळा जेवण बनवले. गॅलप आणि कुकपॅडच्या वार्षिक सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. हा सर्व्हे या गोष्टीवर लक्ष ठेवतो की जगभरातील देशांमध्ये लोक कितीवेळा घरी जेवण बनवतात आणि खातात. हा सर्व्हे 2018 मध्ये सुरू झाला होता.

महामारीच्या काळात त्यामधून समजले की, या काळात पुरुषांनीच अधिक जेवण बनवले होते. गॅलपचे शोध निर्देशक अँर्ड्यू डुगन यांनी सांगितले की, हा सर्व्हे सुरू झाल्यापासून दरवर्षी जेंडर गॅप कमी होत गेला. नव्या सर्व्हेमध्ये मात्र जेवण बनवण्याचा ट्रेंड बदलला असल्याचे दिसून आले. महिलांनी अधिक वेळा जेवण बनवणे सुरूच असून पुरुषांकडून जेवण बनवले जाणे कमी झाले आहे. जेंडर गॅप देशांनुसार वेगवेगळा आढळून येतो.

अमेरिकेत महिला पुरुषांच्या तुलनेत आठवड्याला सरासरी दोन वेळा अधिक जेवण बनवतात. इथिओपिया, तजाकिस्तान, इजिप्त, नेपाळ आणि येमेनमध्ये सर्वाधिक जेंडर गॅप आढळतो. तिथे महिला पुरुषांच्या तुलनेत दर आठवड्याला जवळपास 8 वेळा जेवण बनवतात. जेवण बनवण्याबाबत सर्वात कमी जेंडर गॅप असलेल्या देशांमध्ये स्पेन, युके, फ्रान्स आणि आयर्लंडचा समावेश होतो. सर्व्हेनुसार पूर्ण जगभरात इटली हा एकच देश असा आहे, जिथे पुरुष महिलांच्या तुलनेत अधिकवेळा जेवण बनवतात!

Back to top button