सांगवी: बारामती तालुक्यातील सांगवी येथील श्रीभैरवनाथ व माताजोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित शांततेत चालू असलेला तमाशा पोलिसांनी वेळेचे कारण देत बंद पाडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाच्या फोन नंतर पुन्हा तमाशा सुरू करण्यात आला.
सांगवी येथील श्रीभैरवनाथ व माताजोगेश्वरी यात्रेनिमित्त शुक्रवारी (दि.25) देवांच्या हळदीच्या कार्यक्रमानंतर रात्री ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. शनिवारी (दि.26) सायंकाळी देवांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर रात्री छबिना (पालखी मिरवणूक) ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, गुलालाची मुक्तपणे उधळण करीत मध्यरात्री छबिना पार पडला.
रविवारी (दि.27) सकाळी वसंत नांदवळकर लोकनाट्य तमाशा दुपारी चारपर्यंत झाल्यानंतर जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासह तीनही दिवस यात्रा कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडले.
रविवारी रात्री पुन्हा नांदवळकर यांचा तमाशा सुरू झाला. हा तमाशा शांततेत चालू असताना माळेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वेळेचे कारण देत चालू तमाशा बंद पाडला. चालू तमाशा बंद केल्याने उपस्थित ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले.
काहीकाळ ग्रामस्थ व पोलिसांत माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना तुम्ही तिकडे लक्ष देत नाही आणि आम्ही गावकर्यांनी वर्गणी गोळा करून वर्षातून एकदा सार्वजनिक कार्यक्रम ठेवतो आणि तोही कार्यक्रम तुम्ही वेळेचे कारण देत बंद पाडताय, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केल्या.
यात्रा कमिटी व ग्रामस्थ पोलिसांना विनंती करून ही ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, अखेर राष्ट्रवादी युवकचे अजिंक्य तावरे यांनी मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत झालेला प्रकार सांगितला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांनी किरण तावरे यांच्या माध्यमातून संबंधित पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांना सांगवी येथे सुरू असलेला तमाशा जर शांततेत होत असेल, तर तो कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याची सूचना केली आणि पुढे तोच कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.