

बारामती: “तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला होकार दे, तू जर नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन” असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आदित्य साळुंके (रा. वडगाव निंबाळकर) याच्या विरोधात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वीसवर्षीय महाविद्यालयीन तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली. 22 जानेवारी ते 26 एप्रिल या कालावधीत सोमेश्वरनगरमधील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणी महाविद्यालयात अभ्यास करीत असताना आदित्य साळुंके याने तिच्या जवळ जात तिच्याकडे वाईट भावनेने पाहिले. तू मला होकार दे, असे म्हणून त्याने फिर्यादीस त्रास दिला. तसेच तू नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन, असे सांगत फिर्यादीस ब्लॅकमेल केले. (Latest Pune News)
तरुणीने त्याला माझ्या मागे मागे येऊ नकोस, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, माझ्या मनात तुझ्याविषयी काही एक भावना नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. तरीही त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याच्या भावाला बोलावून घेते असे सांगितले. शिवाय ती दप्तर घेऊन बाहेर पडत असतानाही त्याने तिला जिन्यात अडवले. तू माझ्या घरच्यांना याबाबत काही सांगितले तर मी फाशी घेईन, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे तरुणीने तिच्या घरी हा प्रकार सांगत फिर्याद दाखल केली.