संतोष वळसे पाटील
मंचर: मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळाला. त्यामुळे या वर्षी कांद्याचे दर वाढतील, या आशेने शेतकरी 3 ते 4 लाख रुपये खर्च करून कांदा चाळ बांधत आहेत. कांदा चाळीचा खर्च वाढला परंतु कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शंभर फूट लांब, पाच फूट रुंद कांदा चाळ बांधण्यासाठी अंदाजे एकूण सर्व खर्च दोन लाख रुपये येत आहे. ज्या शेतकर्यांकडे कमी कांदा आहे ते सिंगल कांदा चाळ बांधत आहेत. ज्या शेतकर्यांचा कांदा जास्त आहे, ते डबल कांदा चाळ बांधत आहेत.
1 हजार कांदा पिशवी साठवणूक करण्यासाठी अंदाजे 100 फूट लांब व 5 फूट रुंद आकाराची कांदा चाळ शेतकरी बनवतात. चार ते पाच मजूर घेऊन चार-पाच दिवसांत चाळ तयार होते. चार-पाच दिवसांची मजुरी 50 हजार रुपये होते. एकूण खर्च हा दोन लाखाच्या घरात जातो. काही शेतकरी डबल पाखी कांदा चाळ बनवतात तर ज्यांच्याकडे कमी स्वरूपात कांदा आहे ते सिंगल पाखी चाळ बनवतात.
डबल पाखी कांदा चाळीत ट्रॅक्टर घालण्याची सोय असते. ती कांदा चाळ मोठी व प्रशस्त असते. त्याच्यात मोठ्या प्रमाणात दोन ते अडीच हजार पिशवी कांदा साठवणूक करता येऊ शकते. ती बनवण्यासाठी सर्व साहित्य, मजुरी धरून 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो, अशी माहिती निरगुडसर येथील कांदा चाळ बनवणारे व्यावसायिक उदय टाव्हरे यांनी दिली.
सध्याचा दर अडचणीत आणणारा
कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुढील काही दिवसात बाजारभाव वाढतील, या आशेने शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत. सध्या कांद्याला प्रतवारीनुसार 7 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांदा साठवत आहेत.
इंधनाचे वाढलेले भाव, मजुरी, मशागत, खुरपणी, रासायनिक खते, फवारणी, काढणी, वाहतूक याचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने सध्या असलेल्या दरामध्ये कांदा देणे परवडत नसून हा दर शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा ठरत आहे.