

वेल्हे: दीड हजार लोकसंख्येच्या मांगदरी (ता. राजगड) येथील 78 लाख रुपये खर्चाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम अडीच वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच आहे. तर पाणीपुरवठा प्रशासन सुस्त पडले आहे. त्यामुळे या योजनेला कोणी वालीच नसल्याचे तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तर ग्रामपंचायतीकडून पंप हाऊस व सौरऊर्जा पॅनेलसाठी जागेचे बक्षीसपत्र मिळाले नसल्याने योजना सुरू झाली नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
जलजीवन योजनेच्या जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. या योजनेच्या पाणी टाकीला गळती लागली असून, सर्व जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी मांगडे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे.
मांगदरी गाव परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले.
मात्र, अधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे योजनेचे काम अर्धवट अवस्थेत खितपत पडले आहे. योजनेचे निम्मे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जुन्या पाणी योजनेवर शेकडो ग्रामस्थांनी कशीबशी तहान भागवावी लागत आहे. निकृष्ट दर्जीचे काम करणार्या ठेकेदारावर व दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जुन्या योजनेचे पाणी अपुरे पडत असल्याने जलजीवन योजनेचे पाणी सुरू केले. मात्र, जलवाहिन्या फुटल्याने कारंज्यासारखे फवारे उडत आहेत. त्यामुळे थेंबभर पाणीही गावात गेले नाही. नवीन जलवाहिन्या टाकण्याऐवजी अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. टाकी व जलवाहिन्या जीर्ण होऊन लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
- तानाजी मांगडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
जलजीवन योजनेची बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीकडून पंप हाऊस व सौरऊर्जा पॅनेलसाठी जागेचे बक्षीसपत्र मिळाले नाही. त्यामुळे योजना सुरू झाली नाही. संबंधित ठेकेदाराला जलवाहिन्या व इतर त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-चेतन ठाकुर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजगड पंचायत समिती.