डिंभे धरणाची शंभरीकडे वाटचाल
मंचर : पुढारी वृत्तसेवा : बर्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने अखेर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण अर्थात हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या पाणीसाठ्याची वाटचाल आता शंभरीकडे सुरू झाली आहे. धरणात शुक्रवारी (दि. 8) पाचपर्यंत 95.08 टक्के इतका पाणीसाठा झाला असून, धरणातून 2 हजार 800 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने घोड नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात
आला आहे. भीमाशंकर-आहुपे खोर्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर डिंभे धरण भरणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
मात्र, शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि धरण 95.08 टक्के भरले. धरणाच्या एकूण पाचपैकी तीन दरवाजांतून घोडनदीत 2 हजार 800 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. धरण भरत आल्याने लाभक्षेत्रातील आंबेगावसह शिरूर, श्रीगोंदा, नगर, करमाळा तालुक्यांतील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
विसर्ग सोडल्याने घोड नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार असून, घोड नदीकिनारी असलेल्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर आणि वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे, तानाजी चिखले यांनी दिला आहे. तर शेतकर्यांनी नदीपात्रात असलेले वीजपंप नदीपासून दूर न्यावेत, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, स्थानिक पोलिस पाटील व कोतवाल यांनी नदी परिसरात लक्ष ठेवावे, अशा सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत.
हेही वाचा :

