

पुणे : डिजिटल उपकरणांच्या अतिरेकामुळे तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा जोडण्यासाठी, मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला या डिजिटल गोंधळातून बाहेर काढण्यासाठी 'जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन' ही मोहीम राबवण्यात येत आहे,
यात जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापिका डॉ. रेखा चौधरी, स्वॉन फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि प्रसाद भोपळे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.
तब्बल 80 देशांमध्ये संस्थेची प्रतिज्ञा आणि विविध उपक्रमांनी वेलनेस लीडरशिपद्वारे आयोजित केले जात आहेत. या सर्वांचा जागतिक स्तरावर उत्सव बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात उद्या 10 डिसेंबर रोजी शनिवारवाडा ते शनीपार चौक या मार्गावर सकाळी 8.30 वाजता रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीत पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त योगेश जवादे, सिंहगड फाउंडेशन, अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट, आणि हरीभाई देसाई कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.