पुणे : अग्निपथ, ट्रेन… ही सिनेमांची नाय तर चक्क ढोल-ताशा पथकांच्या तालांची नावे आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण, हे खरंय. हे आणि असे भन्नाट ताल ढोल-ताशा पथकांनी यंदा बसविले असून, गणेशोत्सवात या नवीन तालांचा निनाद पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे. अग्निपथ, ट्रेन, गरबा, लावणी, सोहम, नवीन गावठी, असे कित्येक नवीन ताल पुणेकरांना ऐकता येणार आहेत आणि त्यावर थिरकता येणार आहे. यासाठी पथकातील वादकांनी जोरदार तयारी केली असून, पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये नवीन तालांचा गजर ऐकू येणार आहे.
गणेशोत्सवातील दहाही दिवसांत ढोल-ताशा पथकांच्या तालांचा निनाद तरुणाईला वेड लावतो. मिरवणुकांमध्ये आणि उत्सवाच्या इतर दिवसांमध्येही पथकांद्वारे नेहमीचे पारंपरिक ताल वाजविले जातातच. पण, पथकांकडून दर वर्षी नवीन तालही बसविले जातात आणि त्याचा निनाद उत्सवात ऐकायला मिळतो. या वर्षीही बहुतांश पथकांनी नवीन ताल बसविले आहेत आणि उत्सवात सोहमपासून ते धमारपर्यंतचे नवीन ताल वाजणार आहेत. समर्थ प्रतिष्ठानचे ओंकार कुलकर्णी म्हणाले, की दर वर्षी गणेशोत्सवात नेहमीच्या तालांच्या जोडीला नवीन ताल उत्सवासाठी तयार करण्यात येतात. यंदा आम्ही नवीन गावठी आणि धमार, असे ताल बसविले आहेत.
जुन्या गावठी तालात थोडे बदल करून नवीन गावठी असा ताल बसविला असून, उत्सवात मिरवणुकांमध्ये हे नवीन ताल पुणेकरांना ऐकायला मिळणार आहेत. उत्सवासाठी तरुण वादकांनी जोरदार तयारी केली असून, प्रत्येकाने ताल वाजविण्याचा जोरदार सराव केला आहे. अभेद्य ढोल-ताशा पथकातील वादक अथर्व ठाकूर म्हणाला, सगळे पथक हे काही पारंपरिक ताल वाजवतात.
गावठी, एक ठोका, हे ताल सगळ्या पथकांद्वारे वाजविले जातात. याबरोबर आम्ही मावळ हा नवा ताल वाजविणार आहोत. तरुणाईला थिरकताही येईल आणि उत्साहही कायम राहील, अशा पद्धतीची रचना करून हा मावळ ताल आम्ही बसवला आहे. याशिवाय आम्ही सोहम हा तालही वाजविणार आहोत, यातही वादनाचा जल्लोष नक्कीच पुणेकरांना अनुभवता येईल.
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांच्या तालावर तरुणाई थिरकते, यंदाही तालाच्या निनादात तरुणाईला थिरकवण्यासाठी वादकांनी तयारी केली असून, आम्ही अग्निपथ नावाचा ताल बसविला आहे, यावर तरुणाईला मनसोक्त थिरकता येईल. ट्रेनच्या आवाजावर आधारित ट्रेन तालही वाजवणार आहोत. लावणी, ताल आणि गरबा या तालांचे वादनही गणेशोत्सवाच्या दहाही दिवसांमध्ये होणार आहे. प्रत्येक वादकांमध्ये वादनाचा उत्साह संचारला असून, तोच उत्साह उत्सवात पाहायला मिळणार आहे.
– उमेश आगाशे, अध्यक्ष, शौर्य ढोल-ताशा पथक
हेही वाचा