

खोर : दौंड तालुक्यातील भीमा व मुळा-मुठा नदीकाठावर वसलेल्या गावांमध्ये कर्करोगाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कॅन्सरचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, हा परिसर ‘कॅन्सर झोन’ म्हणून पुढे येत असल्याचे विदारक चित्र स्पष्ट होत आहे.(Latest Pune News)
भीमा नदीच्या खोऱ्यातील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळले जात आहे. तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांसह कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परिणामी नागरिकांचा आहार आणि नदीचे पाणी विषारी झाले आहे. यातूनच सध्या दौंड तालुक्यातील अनेक गावांत कॅन्सरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
दौंड तालुक्यातील एका तरुणाचा कॅन्सरने नुकताच मृत्यू झाला. या घटनेने गावकऱ्यांना धक्का बसला आहे, गेल्या काही वर्षांत प्रत्येक गावामध्ये कर्करोगाने मृत्यू झालेल्या ज्येष्ठांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये वाढणारा कॅन्सर हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण पिढीच्या अस्तित्वावर घोंगावणारे संकट आहे. त्यामुळे ’नदी वाचवा-जीव वाचवा’ हेच आता आपले ध्येय असावे, अशी भावना ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
ग्रामीण भागात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढते आहेत. माझ्याकडे दर महिन्याला जवळपास 300 किमोथेरपी व 35 शस्त्रक्रिया होतात. हे आकडे चिंताजनक आहेत.
डॉ. विशाल खळदकर, कॅन्सरतज्ज्ञ, केडगाव
महिलांचे प्रमाण वाढणार
भारतात दर 100 नागरिकांमागे 2.1 जण कॅन्सरग््रास्त आहेत. पण 2025 पर्यंत एकूण आजारांपैकी 25 टक्के रुग्ण कॅन्सरचे असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यात महिलांचे प्रमाण अधिक असून स्तनाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर दिसतो. कोल्हापूर, गडचिरोली, जयपूर, गुडगाव या भागांप्रमाणेच नदीपट्ट्याचा भागही ‘कॅन्सर बेल्ट’ म्हणून उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
युद्धपातळीवर या उपाययोजना गरजेच्या
नदीत रासायनिक सांडपाणी मिसळण्यावर तातडीने बंदी घालणे
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतांचा मर्यादित वापर किंवा टाळणे
गावोगावी कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन
तालुक्यात आरोग्याबाबत जनजागृती मोहीम
शुद्ध पाणी, सेंद्रिय भाजीपाला, नियमित व्यायामावर भर