

बिबवेवाडी : गेले दहा दिवसांपासून बिबवेवाडी परिसरातील जय हिंदनगर, त्रिमूर्तीनगर, श्रेयसनगर भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे महिला आणि नागरिकांनी स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि निवेदन दिले.(Latest Pune News)
सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी, संजय वाघमारे, सीमा बारड, स्नेहा परदेशी, छाया हातेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बिबवेवाडी अप्पर, अप्पर ओटा, श्रेयसनगर, शेळकेवस्ती, खडकेवस्ती, जय हिंदनगर आणि त्रिमूर्तीनगर भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही ठिकाणी अतिदाबाने पाणी सोडले जात आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे ‘एका बाजूला हसू, एका बाजूला रडू’ अशी अवस्था परिसरातील रहिवाशांची झाली आहे. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे परिसरात अशी अवस्था निर्माण झाली आहे. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता ते उद्धट उत्तरे देत असल्याचे महिलांनी या वेळी सांगितले.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अप्पर, इंदिरानगर भागात पाणी सोडण्यासाठी असलेले कर्मचारी माजी लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील असल्यामुळे एका बाजूला पाणी सोडले, तर दुसऱ्या बाजूला पाणी सोडले जात नाही. परिसरात अनधिकृत नळजोड वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करताना बिबवेवाडी येथील अप्पर परिसरातील महिला आणि नागरिक.