

सासवड : पुढारी वृत्तसेवा : सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव महाराजांच्या प्रस्थानाचा दिवस ज्येष्ठ वद्य द्वादशी हाच संत निवृत्तीनाथांचा समाधी दिवस आहे. म्हणून प्रस्थानाच्या वेळेस वारकर्यांनी आधी निवृत्तीनाथांची स्तुती करणारा अभंग म्हटला
धन्य धन्य निवृत्तीदेवा
काय महिमा वर्णावा
शिवे अवतार धरून
केले त्रैलोक्य पावन
समाधी त्र्यंबक शिखरी
मागे शोभे ब्रह्मगिरी
निवृत्तीनाथाचे चरणी
शरण एका जनार्दनी
या अभंगाच्या ओव्या गात डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ-मृदंग व वीणा घेऊन विठुरायाच्या भेटीच्या ओढीने संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्याने हजारो वैष्णवांना घेऊन पंढरपूरकडे गुरुवारी (दि. 15) आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. या वेळी माउलींसोबतच्या हजारो वारकर्यांनी सासवडच्या संजीवन समाधिस्थळावर व देऊळवाड्याभोवती दर्शनासाठी गर्दी
केली होती.
गुरुवारी बारस व सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान दिन असल्याने मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी झाला. त्यानंतर पहाटे 5 वाज्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. संत सोपानदेवांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी 10 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्या मंदिरात घेण्यात आल्या. त्यानंतर सर्व दिंड्याप्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याचदरम्यान मानकरी अण्णासाहेब केंजळे, पालखी सोहळाप्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी, देवस्थानप्रमुख डॉ. गोपाळ गोसावी महाराज, श्रीकांत गोसावी, हिरूकाका गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट व संत सोपानकाका बँक आणि सासवड नगरपालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत सोपानकाकांची प्रतिमा, श्रीफळ व महावस्त्र देण्यात आले. त्यांनतर संत सोपानदेवांचे पालखी प्रस्थान दुपारी 1:30 ला झाले.
देऊळवाड्यात संत सोपानदेवांच्या पालखीची एक मंदिरप्रदक्षिणा होऊन उत्तरेकडील दरवाजातून हा सोहळा बाहेर पडला. या वेळी हजारो भाविकांनी माउली व सोपानदेवांचा जयघोष केला. सासवडकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. या प्रसंगी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे पांगारेकडे प्रस्थान झाले.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास अधिकारी अमिता पवार, आरोग्य अधिकारी विक्रम काळे, बांधकाम उपअभियंता स्वाती दहिवाल, महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, पुरंदरचे कृषी अधिकारी सुरज जाधव, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, मुख्याधिकारी निखिल मोरे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणच्या देवस्थानचे प्रतिनिधी व दिंडीप्रमुख उपस्थित होते. पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी जेजुरी नाक्यावर आमदार संजय जगताप, पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदुकाका जगताप, संजय चव्हाण उपस्थित होते.
हे ही वाचा :