पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्विक रिस्पॉन्स टीमची प्रात्यक्षिके आणि पोलिस पाइप बँडच्या सुरेख वादनाने शुक्रवारी मोठ्या दिमाखदार पद्धतीने 'तरंग-2023' ला सुरुवात झाली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून 'तरंग'चे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तरंग-2023 या मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 22 ते 24 डिसेंबरदरम्यान शिवाजीनगर येथील मुख्यालयात सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.
कार्यक्रम प्रसंगी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अपर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, आर. राजा, संदीपसिंह गिल, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, पोलिस सहआयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे, सह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिस दलातील विविध शाखा, त्या शाखांमध्ये चालणारे कामकाज, याविषयी ऑडीओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे.
सायबर पोलिस, अमली पदार्थविरोधी पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, डायल 112, राज्य राखीव बल दळणवळण संदेश यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटक आणि त्यांचे कामकाज, याबद्दलची माहिती देण्यात येत आहे.
तरंग-2023 मध्ये विज्ञान प्रदर्शन, गुड टच, बॅड टचसारखे प्रबोधनपर कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, हास्य कलाकार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचबरोबर खाद्यसंस्कृतीचे स्टॉल, विविध कलाकुसर, खादी, दागदागिने, देशी पदार्थ, कपड्यांचे प्रदर्शन येथे भरविाले आहे. आंतकवाद, दहशतवाद, बॉम्बस्फोटासारखी परिस्थिती उद्भवल्यास पुणे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम आतंकवाद्यांचा खात्मा करण्यास कशा पद्धतीने सज्ज आहे, हे जवानांनी प्रात्याक्षिकांद्वारे दाखवून दिले.
डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकाने निकामी केलेले बॉम्बचे प्रात्यक्षिक पाहताना विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पथनाट्याद्वारे विद्यार्थांना अमली पदार्थांचा धोका समजावून सांगण्यात येत आहे. या वेळी महिला सुरक्षा आणि मुलांसाठी तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात येत आहे.
हेही वाचा