पुणेकरांना मिळणार पिफमध्ये 140 चित्रपट पाहण्याची संधी | पुढारी

पुणेकरांना मिळणार पिफमध्ये 140 चित्रपट पाहण्याची संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जगभरातील 51 देशांतील 140 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित हा चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागामध्ये 14 चित्रपटांची निवड करण्यात आली असून, ’चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) हे यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सहा पडदे), लष्कर परिसरातील आयनॉक्स (तीन पडदे) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात (दोन पडदे) या तीन ठिकाणी दाखविले जाणार आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अधिक दोन चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले. फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते.

यावर्षी 68 देशांमधून 1183 चित्रपट महोत्सवासाठी दाखल झाले, त्यापैकी 140 हून अधिक चित्रपटांची महोत्सवासाठी निवड झाली आहे. तसेच, यंदा ज्येष्ठ अभिनेते देव आनंद, ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन, ज्येष्ठ गायक मुकेश, ज्येष्ठ गीतकार शैलेंद्र आदी दिग्गज कलाकारांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महोत्सवात त्यांच्या कला कारकिर्दीवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button