ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी पुढे यावे : मंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी पुढे यावे : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून, त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील नानावाडा या ऐतिहासिक वास्तूमधील क्रांतिकारक संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

या वेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, सुनील देवधर, धीरज घाटे, अभिनेता क्षितिज दाते, उपायुक्त डॉ. चेतना केरुरे आदी उपस्थित होते.
या वेळी पाटील म्हणाले की, शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी सीएसआर बँक विकसित करण्यात येणार आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील शहर घडविण्यासाठी त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

शहराचा सर्वांगीण विकास हीच मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. ठाकूर म्हणाले की, शहरात विविध क्रांतिकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

हेही वाचा

Back to top button